सोलापूर: लोकचळवळीच्या माध्यमातून महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी अभिनेता आमीर खान यांनी पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू केलेल्या पाणी बचतीच्या उपक्रमाची दखल घेत महापालिकेतर्फे मानपत्र देऊन यथोचित गौरव करण्याचा प्रस्ताव २५ मे रोजी होणाºया महापालिकेच्या सभेत देण्यात आला आहे.
अभिनेता आमीर खानने पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून राज्यातील शेकडो गावांसाठी जलमित्र म्हणून नोंदणी सुरू केली आहे. या माध्यमातून सुरू केलेल्या वॉटरकप उपक्रमास मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. सोलापूर जिल्ह्यातही गेली दोन वर्षे ही चळवळ वेगाने वाढत आहे.
उत्तर सोलापूर तालुक्यातील नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी आमीर खान यांनी पत्नीसह श्रमदानात सहभाग नोंदविला. याची प्रेरणा घेत गावातील आबालवृद्धांनी सकाळ व संध्याकाळ अशा दोन सत्रात श्रमदान करून पावसाचे पाणी अडविण्यासाठी तळी तयार केली आहेत. समाजातील प्रत्येक स्तर व तरुणाईला विधायक कार्यासाठी सोबत घेऊन त्यांनी केलेले काम देशाला प्रेरणादायी ठरले आहे. या कार्याची दखल घेत महापालिकेतर्फे मानपत्र देऊन आमीर खान यांचा यथोचित गौरव करण्याचा प्रस्ताव रवी कैय्यावाले, अंबिका पाटील, विनायक वीटकर यांनी दिला आहे.
याचबरोबर वादळी पावसाने भिंत कोसळून मरण पावलेल्या दिव्या गजेली यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करणे, हद्दवाढ विभागात बागा करणे,कुष्ठरोग बेघरांना निवारा बांधण्याचा १ कोटी ५३ लाखांचा ठेका गायत्री कन्स्ट्रक्शनला देण्याचा प्रस्ताव सभेसमोर ठेवण्यात आला आहे. झंवर मळा येथील ड्रेनेजच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी प्रस्ताव दिला होता. यातून महापालिकेने केलेले काम अर्धवट आहे. त्यानंतर वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून जुना कारंबा नाका ते समर्थ हॉटेल ड्रेनेजलाईन टाकण्याचा प्रस्ताव पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी मंजूर केला.
महापालिका निवडणुकीच्यावेळेस कामाचे भूमिपूजन केले. पण आता महामार्ग पार करण्यासाठी परवानगी न मिळाल्याचे कारण पुढे करून बाळे येथील डुमणेनगरात ड्रेनेजलाईन टाकण्याचा बदल जिल्हाधिकाºयांच्या त्रिसदस्यीय समितीकडे पाठविण्यासाठी मंजुरी देण्याचा प्रस्ताव सभेपुढे ठेवला आहे. या प्रस्तावाला विरोध करणार असल्याचे चंदनशिवे यांनी सांगितले. पालकमंत्र्यांनी भूमिपूजन केलेले काम होणे गरजेचे आहे. केवळ मी प्रस्ताव दिला म्हणून बदल करणे बरोबर नाही. दोन्ही कामे माझ्याच प्रभागात असली तरी भगवती सोसायटी ते प्रभाकर सोसायटीतील नागरिकांची सोय होणे महत्त्वाचे आहे.