सांगोला : सोलापूर जिल्ह्यामध्ये पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक व परिचरांची पदे रिक्त आहेत. अनेक दवाखान्यांचा अतिरिक्त पदभार पशुधन विकास अधिकार्याकडे व परिचरअभावी पशुवैद्यकीय दवाखाने बंद ठेवावे लागत आहेत. जिल्हा परिषदेने पशुवैद्यकीय दवाखान्यातील रिक्त पदे तक्ताळ भरावीत, असे जिल्हा शाखेचे अध्यक्ष पशुधन विकास अधिकारी डॉ. अनिल धुमाळ यांनी सांगितले. सोलापूर जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती जालिंंदर लांडे यांनी सोलापूर जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यांना भेटी देऊन तपासणी केली. यावेळी अनेक दवाखाने बंद स्थितीत तर काही ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी हजर नसल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत सभापतींनी मुख्य कार्यकारी अधिकारी श्वेता सिंंघल यांना लेखी पत्र देऊन तसा अहवाल दिला आहे. सलग दोन वर्षे भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे पशुधन विकास अधिकारी, कर्मचार्यांनी जिल्ह्यातील छावण्या व तांत्रिक कामामध्ये उत्कृष्ट काम केले. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तांत्रिक कामकाजात राज्यामध्ये सोलापूर जिल्ह्याला उत्कृष्ट काम केल्यामुळे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देऊन गौरव केला आहे. मात्र पशुवैद्यकीय अधिकारी, कर्मचार्यांची पदे रिक्त असूनही पशुसंवर्धन खात्याचे दैनंदिन कामकाज सुरळीत सुरु आहे. तरीही पशुवैद्यकीय अधिकार्याने दवाखान्यातच बसून कामकाज करावे. १२ मे पासून सर्व पशुवैद्यकीय अधिकार्यांनी दवाखान्यात बसूनच तांत्रिक कामकाज करावे, असे आवाहन राजपत्रित पशुवैद्यकीय संघटनेचे जिल्हा शाखेचे डॉ. अनिल धुमाळ यांनी केले आहे.
------------------------------
अधिकार्यांना स्वच्छतेचीही कामे ४पशुधन विकास अधिकार्याची ४० पदे, पशुधन पर्यवेक्षकांची ३ पदे तर परिचर (शिपाई) ची ६५ पदे रिक्त आहेत. अशा परिस्थितीत प्रत्येक पशुवैद्यकीय दवाखान्याच्या कार्यक्षेत्रात ४ ते ५ गावांचा समावेश आहे. रिक्त पदामुळे काही पशुवैद्यकीय अधिकार्याकडे अतिरिक्त पदभार सोपविला आहे. बर्याच दवाखान्यांत शिपाई जागेचे पद रिक्त असल्याने पशुवैद्यकीय अधिकार्यांनाच पशुसेवेबरोबर स्वच्छतेची कामे करावी लागत आहेत.
--------------------------------
शासनाने सुरु केलेली अनुवंशिक सुधारणा कार्यक्रम व कामधेनू ग्रामदत्तक योजना,लसीकरण मोहीम, कार्यक्षेत्रात जाऊन राबवाव्या लागतात. प्रसंगी कर्मचारी, शिपाई दवाखाने बंद ठेवून कार्यक्षेत्रातील कामकाज पहावे लागत आहे. यामुळे अनेकवेळा दवाखाने बंद असल्याचे निदर्शनास आले आहे. - डॉ. अनिल धुमाळ जिल्हा शाखा अध्यक्ष