सोलापूर : औद्योगिक लवादाने यंत्रमाग कामगारांच्या ईपीएफसंदर्भातील दिलेल्या निर्णयानुसार अंमलबजावणी करण्यात येणार असून, हा कायदा लागू करण्यासाठी पुणे आणि मुंबईहून जादा पीएफ इन्स्पेक्टर मागविण्यात येणार आहेत. ज्या कारखान्यात २० कामगार काम आहेत, अशा सर्व कारखान्यांना ईपीएफ लागू करणे बंधनकारक असल्याचे विभागीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त डॉ. हेमंत तिरपुडे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.
अक्कलकोट रस्त्यावरील हिमालय टेक्स्टाईलने ईपीएफसंदर्भात दाखल केलेल्या दाव्यावर मंगळवारी औद्योगिक लवादाने ईपीएफ लागू करण्याचा निकाल दिला. यासंदर्भात तिरपुडे म्हणाले, लवादाच्या निकालानुसार जेथे २० कामगार ज्या तारखेपासून असतील तेव्हापासून भविष्य निर्वाह निधी कायदा लागू केला जाईल. हिमालय टेक्स्टाईलसारखे एकत्रित उद्देश असणाºया सर्व कारखान्यांना हा कायदा लागू केला जाईल. यासाठी पुणे, मुंबईहून अतिरिक्त पीएफ इन्स्पेक्टर मागविण्यात येतील. हिमालय टेक्स्टाईलला २००२ पासून हा कायदा लागू करण्यात येणार आहे. या कामगारांना ईपीएफबरोबरच निवृत्तीवेतनाचा लाभदेखील मिळणार आहे. ज्या कामगारांचा मृत्यू झाला असेल त्यांच्या वारसांना ईपीएफ आणि पेन्शनची रक्कम देण्यात येणार असल्याचे तिरपुडे यांनी सांगितले.
इन्स्पेक्शन करणार- जे कारखाने स्वत:हून आॅनलाईन नोंदणी करणार नाहीत त्या कारखान्याचे इन्स्पेक्शन केले जाणार आहे. कागदपत्रे तपासून यासंदर्भातील कारवाई करण्यात येणार आहे. लवादाने हिमालय टेक्स्टाईलला अपिल करण्यासाठी चार आठवड्यांची मुदत दिली आहे, या मुदतीत त्यांनी अपिल करून ईपीएफ कार्यालयास न कळविल्यास चार आठवड्यानंतर कारवाई सुरू करण्यात येईल, असे तिरपुडे म्हणाले.
जे यंत्रमाग कारखाने ईपीएफच्या नियमांना पात्र आहेत. त्यांनी स्वत:हून भविष्य निर्वाह निधी कार्यालयात आॅनलाईन नोंदणी करावी. त्यांना प्रशासनातर्फे माहिती, मदत आणि प्रशिक्षणाची सोय करण्यात येईल. - डॉ. हेमंत तिरपुडेविभागीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त