सोलापूर : सर्वसामान्य नागरिकांसह व्यापाऱ्यांमध्ये दहशत पसरवून प्राणघातक हल्ला करणे, यासह गंभीर गुन्हे केल्याप्रकरणी सराईत गुन्हेगार अदित्य शैलेंद्र माने ( वय- २१, रा. थोबडे मळा, देगाव नाका, सोलापूर) याच्यावर एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली. पोलीस आयुक्तांनी आदेश बजावून त्याची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली.
अवैध मार्गाने आर्थिक फायदा मिळविण्यासाठी माने याने जुना देगाव नाका, हब्बू वस्ती, अमराई, मरीआई चौक, दमाणी नगर, वसंत विहार, शेटे नगर, केगाव, न्यू लक्ष्मी चाळ परिसरात दहशत व भिती निर्माण केली. साथीदारांच्या मदतीने जबरी चोरी, हल्ला करुन अनेकांना इजा पोहचवली. व्यापार्यांसह सर्वसामान्य नागरिकांकडे खंडणी मागण्याचे गुन्हे मानेयाने केल्याची नोंद पोलिसात झाली.
चार गंभीर गुन्हे करून सामाजिक शांततेला बाधा निर्माण करणाऱ्या अदित्य मानेवर सन २०२१ मध्ये दोनवेळातिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र त्यानंतरही त्याच्यामध्ये सुधारणा झाली नाही. यामुळे पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांनी त्याच्यावर स्थानबध्दतेची कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर या आदेशाची अंमलबजावणी करून पुणे येथील येरवडा कारागृहात मानेची रवानगी करण्यात आली.
ही कारवाई पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने, पोलीस उपायुक्त (गुन्हे) डॉ. दीपाली काळे, उपायुक्त (परिमंडळ) विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) प्रांजली सोनवणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनील दोरगे, पोलीस निरीक्षक विश्वनाथ सिद यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विशेंद्रसिंग बायस, स्थानबध्द पथकातील पोलीस हवालदार विनायक संगमवार, सुदीप शिंदे, अक्षय जाधव, विशाल नवले केली.