सोलापूर : ग्लोबल टिचर रणजित डिसले यांना मानसिक त्रास दिला, पैसे मागितल्याचा आरोप केला म्हणून नोटीस देणारे जिल्हा परिषद प्रशासन आता चांगलेच अडचणीत आले आहे. शिक्षक समायोजनात आर्थिक उलाढाल झाल्याचा आरोप अर्थ व बांधकाम समितीचे सभापती विजयराज डोंगरे यांनी केला आहे.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने गेल्या आठवड्यात समायोजनातून जवळपास ७१ शिक्षकांच्या बदल्या केल्या. उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये ५४ तर विभागीय आयुक्तांकडे अपिल केलेल्या १७ शिक्षकांच्या बदल्या केल्याचे सांगण्यात आले. आंतरजिल्हा बदलून आलेल्या शिक्षकांना नियुक्त्या दिल्या होत्या. या नियुक्त्या मिळवताना शिक्षकांनी चुकीची माहिती दिली म्हणून प्रशासनाने कारवाई प्रस्तावित केली होती. याविरूद्ध शिक्षकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यानंतर शिक्षकांच्या बाजूने निकाल लागला होता. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशान्वये ५४ शिक्षकांच्या समायोजनाने बदल्या करायच्या होत्या. तसेच विभागीय आयुक्तांकडून आलेल्यांनाही नियुक्ती दिली गेली. या नियुक्त्या देताना आर्थिक उलाढाल झाल्याचा आरोप सभापती डोंगरे यांनी केला आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांनी मात्र हे आरोप फेटाळले आहेत.
प्रशासन अडचणीत
ग्लोबल टिचर डिसले यांनी प्रसारमाध्यमांसमोर केलेल्या आरोपाची प्रशासनाने गंभीर दखल घेतली हाेती. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी त्यांना नोटीस बजावली होती. आता खुद्द सभापतींनीच बदल्यांमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला आहे. लोकशासन आंदोलन पार्टीचे जिल्हा संघटक राजू दिंडोरे यांनी शिक्षणाधिकारी लोहार यांच्या बदलीची मागणी केली आहे. त्यामुळे या आरोपांचीही चौकशी होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिक्षक बदल्यांचे मला अधिकार नाहीत. उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये पात्र शिक्षकांना नियुक्त्या देण्याचे प्रस्ताव प्रशासन विभागामार्फत पाठविले होते. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अधिकारात या नियुक्त्या झाल्या आहेत. प्रशासन विभागच यावर निर्णय घेईल.
- डॉ. किरण लोहार, शिक्षणाधिकारी