सोलापूर/मंगळवेढा : वारंवार अडचणी सांगूनही त्या अडचणी सोडविण्यासाठी चालढकल करणाऱ्या शासनाविरोधात रोष प्रकट करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील तलाठी व मंडल अधिकारी यांनी बेमुदत रजा आंदोलन करण्यास सुरूवात केली आहे. बुधवारी जिल्ह्यातील तहसिल कार्यालयासमोर विविध तालुक्यातील तलाठी संघटनेने आंदोलन करून संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.
मंगळवेढा तालुक्यातील मंडल अधिकारी व तलाठी संघाने विविध मागण्यांसाठी बेमुदत रजा आंदोलन पुकारले असून यासंदर्भात तहसीलदार स्वप्नील रावडे यांना निवेदन देण्यात आले आहे.
याप्रसंगी अध्यक्ष उमेश सूर्यवंशी, सचिव समाधान वगरे, कार्याध्यक्ष विजय एकतपुरे, सदस्य मधुकर वाघमोडे, विजय शिंदे, बाळू कोळी, शामबाला कुंभार, नजमिन मौलवी, बदन राठोड, राजाराम रायभान, सूरज नळे, अनिल चव्हाण, भारत गायकवाड, प्रताप घुनावत, मनोज तवले, सतीश गुरुपवार, मनोज संकपाळ, श्रीरंग लोखंडे, अजय जिरापुरे, भडंगे आदीजण उपस्थित होते.
मंगळवेढा तालुका तलाठी संघाने तलाठी संवर्गातील मंडळ अधिकारी, अव्वल कारकुन व नायब तहसिलदार यांच्या विविध प्रकारच्या ३७ मागण्यांसाठी १९ जानेवारी २०२१ पासुन बेमुदत रजा आंदोलन पुकारलेले होते. परंतु प्रशासनाकडून वेळोवेळी बैठका घेवूनही व संघाचे पदाधिकारी यांनी मागण्यांबाबत वारंवार पाठपुरावा करून देखील अद्यापपर्यत निवेदनातील मुद्यांबाबत प्रशासन गांभीर्यपूर्वक विचार करताना दिसून येत नाही.
--------------
तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या अडचणी सोडविणेबाबत प्रशासनाची उदासिनता दिसून येत आहे. म्हणुन सोलापूर जिल्हा तलाठी संघाने व मंगळवेढा तालुका तलाठी संघटनेने स्थगित केलेले आंदोलन ७ जुलै पासुन बेमुदत रजा आंदोलन पुकारले आहे
- उमेश सूर्यवंशी, तालुकाध्यक्ष तलाठी संघटना मंगळवेढा