राकेश कदम, साेलापूर: राज्यातील महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगरपालिकांचे प्रशासक सरकारला कमीशन देतात. या हिशेबाचे रेकाॅर्ड आमच्याकडे आले आहे. हे रेकाॅर्ड आम्ही अधिवेशनात मांडू, असा खळबळजनक आराेप काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांनी केला.
येथील शहर काॅंग्रेसचा कार्यकर्ता मेळावा रविवारी पटाेले यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी मंचावर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थाेरात, माजी मंत्री अस्लम शेख, नसीम खान, भाई जगताप, माेहन जाेशी, अतुल लाेंढे, आमदार प्रणिती शिंदे आदी उपस्थित हाेते.
पटाेले म्हणाले, भाजप सरकारला महापालिकांच्या निवडणुका नकाे आहेत. सव्वा वर्षापासून महापालिकांवर प्रशासक आहे. साेलापुरातही जागाेजागी कचरा पडलेला आहे. आपला लाेकप्रतिनिधी नसल्याने कुणाला जाब विचारता येत नाही. महापालिकांचे आयुक्त कुणाचे एेकत नाही. महापालिका आयुक्तांना सरकारला हिशेब द्यावा लागताे. महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिकांचे प्रशासक कसे वागतात. काय हिशेब चाललाय याचे रेकाॅर्ड आमच्याकडे आलेले आहे, असेही पटाेले म्हणाले.
भाजप नेत्यांकडेच दाेन हजाराच्या नाेटा सापडल्या
पत्रकार परिषदेत पटाेले म्हणाले, नाेटा छापणे म्हणजे कागदं छापायची नसतात. त्यासाठी जागतिक बॅंकेचे काही नियम आहेत. एक हजाराची बंद करुन दाेन हजाराची नाेट आणली. आता दाेन हजाराची नाेट बंद करुन तुघलकी, लहरी कारभार सुरू असल्याचे दाखवून दिले. दाेन हजाराच्या नाेटा कुणाकडे आहेत. पुण्यातील कसबा निवडणुकीत भाजप नेत्यांकडेच दाेन हजाराच्या नाेटा सापडल्या, अशी टीका पटाेले यांनी केली.