सोलापूर : शहरातील सिनेमागृहे, नाट्यगृहे, जलतरण, बॅडमिंटन हॉलसह बंदिस्त जागेतील खेळांना शुक्रवारपासून परवानगी देण्यात आली आहे. सिनेमा आणि नाट्यगृहात क्षमतेच्या ५० टक्केच उपस्थिती असावी, असे बंधन घालण्यात आले आहे.
राज्य शासनाने यासंदर्भात बुधवारी आदेश जारी केले होते. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने आदेश जाहीर केले. परंतु, महापालिकेचा आदेश निघाला नव्हता. महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी शुक्रवारी सायंकाळी आदेश जारी केले. जलतरण तलाव वापरास परवानगी असेल. मात्र याबाबतची मानके क्रीडा व युवक कल्याण विभागाकडून निश्चित करण्यात यावीत. प्रतिबंधित क्षेत्राबाहेर योग शिक्षण देणाऱ्या संस्थांना कामकाज करण्यास परवानगी असेल. बंदिस्त जागेतील बॅडमिंटन, टेनिस, स्क्वॅश, शूटिंग, रेंजर्स आदी खेळ खेळण्यास सुरक्षित अंतर आणि स्वच्छतेच्या उपाययोजना करून परवानगी देण्यात येत आहे. प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील सिनेमागृह, नाट्यगृह, मल्टिप्लेक्सही त्यांच्या ५० टक्के इतक्या बैठक व्यवस्थेच्या मर्यादेत चालू करण्यास परवानगी देण्यात येत आहे. कोणत्याही प्रकारचे खाद्यपदार्थ सिनेमा आणि नाट्यगृहात नेता येणार नाही.
नियमांचे पालन आवश्यक
या अनलॉकमध्ये सिनेमागृह, नाट्यगृहांना परवानगी देताना शासनाने प्रतिबंधीत क्षेत्राबाबतचा नियम लागू केला आहे. या क्षेत्रामध्ये असलेले कोणतेही उपक्रम सुरू राहणार नाहीत. बंदिस्त जागेतील उपक्रम सुरू करताना क्षमतेची मर्यादा घालण्यात आलेली आहेच; पण फिजिकल डिस्टन्सही पाळणे आवश्यक आहे.