भीमानगर: उजनी धरणातून कालव्याला रब्बी हंगामासाठी बुधवारी सायंकाळी ५ वाजल्यापासून पाणी सोडण्यात आले. हे पाणी डाव्या व उजव्या दोन्ही कालव्याला सोडण्यात येणार आहे. सुरूवातीला २०० क्युसेक व नंतर ५०० क्युसेक व येत्या दोन दिवसांत २८०० ते ३००० क्युसेकनी पाणी सोडण्यात येणार आहे.
सुरुवातीला दोन जानेवारीला सुटणारी पाळी नंतर २० जानेवारीला ठरली, परंतु पाणी मागणीस उठावच नसल्याने सुमारे एक महिनाभर पाणीपाळी पुढे ढकलण्यात आली. कालवा सल्लागार समितीने मिटिंग घेऊन २० फेब्रुवारीला पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. याचा फायदा मात्र ऐन उन्हाळ्यात शेतकºयांच्या पिकांना होणार असून, यामुळे धरणातील पाणीसाठाही स्थिर राहिला आणि हेच पाणी आता एप्रिल, मे व जून या महिन्यांत उपयोगी येणार आहे.
उजनी धरण व्यवस्थापन विभागाने उशिरा का होईना पाणी काटकसर केल्यामुळे येणाºया काळात याचा फायदा दिसून येणार आहे.उजनी धरणातील पाणीसाठा २०.४२ टक्के असून, उपयुक्त १०.९४ टीएमसी आहे. त्यामुळे आता येणाºया महिनाभरात उजनी धरण मायनसमध्ये प्रवेश करेल व तिथून पुढे पाणी मात्र काटकसरीने वापरावे लागेल. आजच्या स्थितीला दहिगाव उपसा सिंचन योजना, सीना-माढा उपसा सिंचन योजना, बोगदा या सर्वांसाठी पाणी सुरू असून, थोड्याच दिवसात नदीला पाणी सोडण्यात येईल म्हणजेच झपाट्याने पाणी कमी होणार हे मात्र नक्की आहे. गेल्यावर्षी आजच्या दिवशी उजनीची पाणीपातळी ७७.३८ टक्के होती.
उजनीची आजची स्थिती
- - एकूण पाणीपातळी: ४९२.४९५ मीटर
- - एकूण पाणीसाठा :२११२.६७ दलघमी
- - उपयुक्त पाणीसाठा : ३०९.८५ दलघमी
- - टक्केवारी: २०.४२
- - एकूण: ७४.६० टीएमसी
- - उपयुक्त : १०.९४ टीएमसी
- - बोगदा: ९०० क्युसेक
- - सीना-माढा उपसा: २८० क्युसेक
- - दहिगाव उपसा: ९० क्युसेक
- - कालवा: ५०० क्युसेक