सोलापूर : स्मार्ट सिटी योजनेतून पासपोर्ट आॅफिसलगत अॅडव्हेंचर पार्कचे काम पूर्ण झाले आहे. हे पार्क लवकरात लवकर खुले करण्यात येईल, अशी माहिती महापौर शोभा बनशेट्टी यांनी दिली. परंतु, या पार्कमधील अनेक झाडांवर वटवाघळांचे वास्तव्य आहे. अॅडव्हेंचर पार्कमुळे या वटवाघळांच्या अधिवासाला धोका निर्माण होत आहे. महापालिकेने वेळीच काळजी न घेतल्यास अधिकाºयांविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत फिर्याद देण्यात येईल, असा इशारा वन्यजीवप्रेमी पंकज चिंदरकर आणि भरत छेडा यांनी दिला आहे.
स्मार्ट सिटी योजनेतून साडेचार कोटी रुपये खर्चून अॅडव्हेंचर पार्क तयार करण्यात आले आहे. महापौर शोभा बनशेट्टी, स्मार्ट सिटीचे अधिकारी तपन डंके यांच्यासह अधिकाºयांनी मंगळवारी अॅडव्हेंचर पार्कच्या कामाची पाहणी केली. या अॅडव्हेंचर पार्कमध्ये रॉक क्लायंबिंंग, रोप क्लायंबिंंग, ट्रम्पलिंग, ओपन अॅम्फी थिएटर, वॉकिंग ट्रॅक, फूट्स सॉल, नर्सरी, घरगुंडी, सीसॉ आदींचा समावेश आहे. या पार्कची निगा राखण्याचे काम निखिल कस्ट्रक्शन कंपनी करणार आहे. शिवाय एका खासगी कंपनीला ते चालविण्यासाठी देण्यात येणार आहे. १७ जूनला शाळा सुरू होणार आहेत. तत्पूर्वीच अॅडव्हेंचर पार्क खुले झाल्यास शहरातील नागरिकांची सोय होईल. त्यादृष्टीने प्रयत्न करा, अशी सूचना महापौरांनी केली. स्मार्ट सिटीचे सीईओ दीपक तावरे यांच्याशी चर्चा करू, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, अॅडव्हेंचर पार्कमधील झाडांवर वटवाघळांचे वास्तव्य असल्याचे वन्यजीवप्रेमींना लक्षात आणून दिले होते. तरीही या पार्कचे काम करण्यात आले. आता पार्क सुरू करण्याची वेळ आली असताना या झाडांवरील अनेक वटवाघळे गायब होत असल्याचे वन्यजीवप्रेमींचे म्हणणे आहे.
तर अधिकारी अडचणीत येतील-चिंदरकर- वन्यजीवप्रेमी पंकज चिंदरकर म्हणाले, जैवविविधतेच्या संवर्धनामध्ये वटवाघळांचा मोठा वाटा आहे. या पार्कमधील झाडांवर मोठी वटवाघळे आहेत. बहुतांश वटवाघळे हे किडे आणि डास खातात. काही वटवाघळे फळे खातात. त्यांच्या विष्ठेतून पडलेल्या बियांद्वारे झाडे उगवतात. नैसर्गिकदृष्टीने होणारे हे वृक्षारोपण खूप मोठे आहे. अॅडव्हेंचर पार्कचे काम करताना अनेक झाडांच्या फांद्या तोडण्यात आल्या. आता या ठिकाणी लाईट, साउंडसह वायरिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. यातून वटवाघळांचा नैसर्गिक अधिवास नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. या कामाबाबत महापालिका आणि वनविभागाकडे तक्रार देण्यात आली होती. वनविभागाने महापालिकेला पत्रही पाठविले आहे. तरीही महापालिका दुर्लक्ष करीत असेल तर अधिकारी अडचणीत येतील, असा इशाराही चिंदरकर यांनी दिला.
अॅडव्हेंचर पार्कमधील वटवाघळांचे वास्तव्य आणि वन्यजीवप्रेमींची तक्रार याबद्दल मला कल्पना नाही. पण याबाबत त्यांना विश्वासात घेण्यात येईल. वटवाघळांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. -दीपक तावरे, आयुक्त, महापालिका.