आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २२ : यशासाठी कोणताही शॉर्टकट नसतो. त्यामुळे परिश्रम घ्या. नवीन वकिलांनी पैसे कमविण्याची घाई करू नये. पैशाच्या मागे लागलात तर यशाची संधी जाईल. सुरूवातीला ज्ञान संपादन करण्यासाठी कष्ट करा, असा संदेश महाराष्ट्राचे महाअधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी आज येथे दिला.कुंभकोणी हे मूळचे सोलापूरचे आहेत. शिवाय ते सोलापूर बार असोसिएशनचे सदस्य आहेत. महाअधिवक्तापदावर नियुक्ती झाल्याबद्दल असोसिएशनच्या वतीने येथील शिवछत्रपती रंगभवन सभागृहात त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत अणेकर, बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. लक्ष्मण मारडकर, कुंभकोणी यांचे वडील अॅड. अरविंद कुंभकोणी, कुंभकोणी यांच्या पत्नी अनुजा, महाराष्ट्र व गोवा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅड. मिलिंद थोबडे, सोलापूर बार असोसिएशनचे उपाध्यक्ष बाबासाहेब जाधव, जिल्हा सरकारी वकील अॅड. संतोष न्हावकर, खजिनदार यशोधन कणबसकर, अॅड. हेमंतकुमार साका आदी मंचावर होते.अॅड. कुंभकोणी म्हणाले, सोलापूर बार असोसिएशनला मी माझे कुटुंब मानतो. कुटुंबाकडून हा सत्कार होतोय. मी कोणत्याही सर्वोच्च पदावर पोहोचलो तरी सोलापूरच्या जिल्हा न्यायालयात वकिली केली, हेच माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. राष्ट्रपतीभवनात जेव्हा मला पुरस्कार मिळाला तेव्हाही मी माझ्या परिचयात सोलापूर कोर्टात वकिली केल्याचा उल्लेख करणे मी आयोजकांना भाग पाडले. राज्यातील मी सर्वोच्च विधी अधिकारी आहे. त्यामुळे कुटुंबप्रमुख आहे. ही जबाबदारी मी समर्थपणे पेलेन. सोलापूर बार असोसिएशनच्या कोणत्याही सदस्याने मला बेधडकपणे व्यक्तिगत स्वरूपाची मदत मागावी. मी ती करेन; पण महाअधिवक्तापदाची शान आणि मान राखण्याची माझी जबाबदारी आहे. तशी ती तुमचीही आहे. त्यामुळे मागितली जाणारी मदत ही रचनात्मक आणि सकारात्मक असली पाहिजे, असे ते म्हणाले.युवा वकिलांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, वकिली व्यवसाय हा ठिसूळ आहे. या क्षेत्रात सुरूवातीला अपयश आले की, पुन्हा वकील यशस्वी होऊ शकत नाही. येथे एकदाच संधी मिळते. त्यामुळे नवीन वकिलांनी पैशाच्या मागे न लागता सुरूवातीला ज्ञानासाठी परिश्रम घेतले पाहिजे. या व्यवसायात नैतिकतेलाही महत्त्व आहे. ती जपली पाहिजे, असे ते म्हणाले. ज्येष्ठ वकिलांनाही त्यांनी संदेश दिला. कनिष्ठ वकिलांना स्पर्धक न मानता आपली संपत्ती मानावे आणि बार असोसिएशन विकसित करण्यासाठी प्रयत्न करावा, असे त्यांनी सांगितले.यावेळी अॅड. थोबडे, अॅड. विजय मराठे यांनी कुंभकोणी यांच्यासंदर्भातील आठवणी सांगितल्या. प्रारंभी अॅड. मारडकर यांनी प्रास्ताविक केले. कणबसकर यांनी मानपत्राचे वाचन केले. अॅड. गणेश पवार यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी पोलीस आयुक्त महादेव तांबडे, अॅड. धनंजय माने, अॅड. रघुनाथ दामले, अॅड. अळंगे, पालिकेचे माजी उपायुक्त अनिल विपत, अॅड. गायकवाड यांच्यासह सोलापूरकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वकिलांनी पैसे कमवायची घाई टाळावी : महाअधिवक्ता आशुतोष कुंभकोणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 11:05 AM