सोलापूर - सातासमुद्रापार असलेल्या पश्चिम आफ्रिकेतील सेनेगल देशात मोठे गारमेंट पार्क उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आधुनिक युगात दर्जेदार गारमेंट पार्क उभारण्यासाठी आम्हाला सोलापुरातील उद्योजकांची गरज आहे. दोन्ही देशांचे व्यापारी संबंध घनिष्ठ झाल्यास, भविष्यात दोघांनाही मोठा फायदा होईल, अशी माहिती सॉल इंडस्ट्रीज सेनेगलचे प्रेसिडेंट मामाडाऊ सॉल यांनी दिली.अक्कलकोट रोड एम.आय.डी.सी. येथील प्रामाणिक एक्स्पोर्ट येथे त्यांनी भेट दिली. या वेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख, सेनेगल येथील आब्दु, शेरीफ, राज्य बँकेचे प्रशासकीय संचालक अविनाश महागावकर, सोलापूर रेडिमेड कापड उत्पादक संघाचे अध्यक्ष रामवल्लभ जाजू, सहसचिव अमित जैन, उपाध्यक्ष नीलेश शहा, महावीर टेक्स्टाइल्सचे प्रकाशचंद डाकलिया आदी उद्योजक उपस्थित होते. मामाडाऊ सॉल म्हणाले की, सेनेगलसह गाम्बिया, गिनी या देशातील गारमेंट पार्क उद्योग मोठ्या प्रमाणात विकसित करायचा आहे. सोलापुरातील गारमेंट व टॉवेल उत्पादन आम्ही सेनेगल येथे घेऊन जाण्याचा विचार करीत आहोत. आमच्या देशात सोलापूरसारखे गारमेंट व टॉवेल फॅक्टरी उभारायची आहे़केंद्र शासनाच्या वतीने जून २०१७ मध्ये अहमदाबादमध्ये आंतरराष्ट्रीय गारमेंट प्रदर्शन भरविण्यात आले होते. या प्रदर्शनात मामाडाऊ सॉल यांनी सोलापूरच्या गारमेंट व टॉवेल उद्योगाची सविस्तर माहिती घेतली होती. त्या वेळी मी त्यांना सोलापूरला येण्याचे आमंत्रण दिले होते. त्यानुसार, ते सोलापुरात आले असून, व्यापारवाढीसाठी सकारात्मक प्रयत्न केले जातील.- सुभाष देशमुख, सहकारमंत्री
आफ्रिकन ‘गारमेंट’ला हवी सोलापुरातून मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2018 4:25 AM