सोलापूर - राज्यातील काही ग्रामपंचायतींचे निकाल हाती येत आहेत. या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये जरी पक्षीय चिन्हाचा वापर नसला किंवा पक्षाच्या नावाने या निवडणुका होत नसल्यातरी पक्षातील नेत्यांचा अप्रत्यक्ष सहभाग असतोच. सोलापूरच्या चिंचपूर येथील ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेतील उद्धव ठाकरे गटाने बाजी मारल्यानंतर आता दक्षिण सोलापूरातही 15 वर्षांपासूनची सत्ता भाजप समर्थक गटाला गमवावी लागली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मनगोळी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ग्रामदैवत अमोगसिद्ध बहुजन ग्रामविकास पॅनल बहुमताने विजयी झाला आहे. येथील ग्रामपंचायतीवर ग्रामदैवत अमोगसिद्ध बहुजन ग्रामविकास पॅनलच्या 6 पैकी 5 उमेदवारांनी बाजी मारली. विशेष म्हणजे गेल्या 15 वर्षांपासून येथील ग्रामपंयतीवर भाजपच्या नेतृत्वातील गटाची सत्ता होती. त्यामुळे, 15 वर्षांपासूनच्या भाजपच्या सत्तेला येथे खिंडार पडल्याचं दिसून येते आहे. भाजपाचे माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या पॅनलला येथे केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरेश हसापुरे यांच्या नेतृत्वात सर्व पक्षांनी मिळून भाजपचा धुव्वा उडवला. त्यामुळे, दक्षिण सोलापूर तालुक्यातील दोन्ही ग्रामपंचायती भाजपच्या हातून निसटल्या आहेत. विजयी उमेदवाराच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत हलगीच्या तालावर आनंदोत्सव साजरा करत जल्लोष केला.