रवींद्र देशमुखसोलापूर: अशौचामुळे ज्यांना १० आॅक्टोबर रोजी घटस्थापना करणे शक्य झाले नाही त्यांनी अशौच निवृत्ति नंतर (अशौच संपल्यावर) आता १३ आॅक्टोबर, १६ आॅक्टोबर, १७ आॅक्टोबर यापैकी कोणत्याही दिवशी घटस्थापना करावी व १८ रोजी नवरात्रोत्थापन करावे, असे आवाहन पंचांगकर्ते मोहन दाते यांनी 'लोकमत 'शी बोलताना केले.
ज्या कुटूंबात एखाद्याचे निधन झाले असेल तर सुतक पाळले जाते. सुतकाचा काळ म्हणजे अशौच होय, असे सांगून दाते म्हणाले की, अशौच कालावधी संपल्यानंतर कुलधर्म - कुलाचार करावे, असे शास्त्रकारांनी सूचित केले आहे शिवाय ते करण्याचीही सश्रद्ध समाजाची मानसिकता असते. त्यामुळे वरील तारखापासून घटस्थापना करून नवरात्र साजरे करता येईल.
नवरात्रीमधील अन्य तिथीबद्दल दाते यांनी सांगितले की, महालक्ष्मी पूजन (घागरी फुंकणे) ह्या दिवशी मध्यरात्री अष्टमी तिथीवर देवीचे पूजन करण्याची प्रथा आहे. अशी अष्टमी १६ आॅक्टोबर रोजी मध्यरात्री मिळते त्यामुळे त्या दिवशी महालक्ष्मीपूजन दिलेले आहे.
दुर्गाष्टमी १७ आॅक्टोबर रोजी आहे.विजया दशमी, दसरा, सीमोल्लंघन हे १८ आॅक्टोबर रोजी असून साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला दसरा हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी विजय मुहूर्तावर अनेक लोक आपल्या नवीन उपक्रमाचा आरंभ करतात. हा विजय मुहूर्त दुपारी २/२० ते ३/०७ या दरम्यान आहे.