राकेश कदम, साेलापूर: उजनी धरणातून साेडलेले पाणी बुधवारी चिंचपूर बंधाऱ्यात पाेहाेचले. जलसंपदा विभागाने औज आणि चिंचपूर बंधारे भरून घेतले आहेत. हे दाेन्ही बंधारे भरल्यामुळे साेलापूर शहराची दीड महिन्यांची पाणी चिंता दूर झाल्याचा दावा महापालिकेचे सार्वजनिक आराेग्य अभियंता व्यंकटेश चाैबे यांनी केला.
साेलापूर शहराला उजनी ते साेलापूर जलवाहिनी, औज ते साेरेगाव पाणी पुरवठा याेजना, हिप्परगा तलाव अशा तीन स्राेतांमधून पाणी पुरवठा हाेताे. औज बंधारा १५ दिवसांपूर्वी काेरडा पडला हाेता. हा बंधारा भरून घेण्यासाठी उजनी धरणातून भीमा नदीत पाणी साेडण्यात आले. हे पाणी मंगळवारी औज बंधाऱ्यात पाेहाेचले हाेते. बुधवारी पहाटे औज बंधारा भरून घेण्यात आला. त्यानंतर सकाळी चिंचपूर बंधाराही भरून घेण्यात आला. गेल्या दाेन्ही बंधाऱ्यांमध्ये मिळून सुमारे अर्धा टीएमसी पाणी आहे. नदीकाठी पाणी उपसा हाेउ नये म्हणून महावितरण कंपनीने वीजपुरवठा बंद ठेवला आहे.
उजनी धरणाची पाणी पातळी वजा ५० टक्क्यांच्या खाली गेली आहे. यापुढील काळात या धरणातून शहरासाठी भीमा नदीत पाणी साेडता येणार आहे. शहराची मदार आता उजनी धरण क्षेत्रात अर्थात पुणे जिल्ह्यात हाेणाऱ्या पावसावर आहे.