सोलापूर : वरवडेत एका दुग्ध व्यवसायिकाचे घर फोडून दागिन्यांसह ५५ हजारांचा ऐवज घेऊन पोबारा करीत असताना सतर्क नागरिकांनी आणि ग्राम सुरक्षा दलाच्या तरुणांनी चोरट्यांचा पाठलाग केला. या पाठलागात दोघेजण सापडले आणि त्यांचा तिसरा साथिदार पळून जाण्यात यशस्वी झाला.
रवी चंद्रकांत पवार, किरण अनिल काळे असे नागरिकांच्या तावडीत सापडलेल्या संशयीत चोरट्यांची नावे असून तिसरा साथिदार चिरंजीव उर्फ खोडघ्या हरकून काळे (तिघे रा. सय्यद वरवडे, ता. मोहोळ) हा फरार झाला. त्या दोघांना टेंभुर्णी पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
पोलीस सूत्राकडील माहितीनुसार दुग्ध व्यवसायिक दत्तात्रय मोहन गवळी हे कुटुंबासह वरवडे टोल नाक्याजवळ शेतात राहतात. उकाडा जाणवत असल्याने सोमवारी रात्री गवळी कुटूंब घर बंद करुन गच्चीवर झोपी गेले होते. मंगळवारी मध्यरात्री २.४५ वाजण्याच्या सुमारास संशयीत चोरटे गवळी यांच्या बंद घराचा कडीकोयंडा उचकटून प्रवेश केला आणि पाच ग्रॅम कर्णफुले व रोख रक्कम ३० हजार रुपये असा ५५ हजार रुपयांचा ऐवज घेऊन पळ काढला. त्यानंतर दत्तात्रय गवळी यांनी टेंभुर्णी पोलिसात धाव घेऊन फिर्याद दिली. अधिक तपास ठाणे अंमलदार गणेश जगताप करीत आहेत.ग्रामसुरक्षा दलाचा फोन वाजला दोघांना पकडून पोलिसांना दिले... मागील तीन दिवसांपासून मोडनिंब, बावी, अरण परिसरात रात्री चोरटे फिरत असल्याचे काही तरुणांना दिसून आले. या तरुणांनी याबाबत ग्रामसुरक्षा दलाच्या तरुणांनी माहिती पसरवली होती. यावरुन लोक जागृत झाले. मंगळवारी मध्यरात्रीनंतर वरवडे परिसरात याच चोरट्यांनी चोरी करून पोबारा करताना ग्रामसुरक्षा दलाचा फोजन वाजला आणि सर्वांना संदेश गेला. नागरिकांनी पाठलाग केला आणि तिघांपैकी दोघांना पकडून पोलिसांच्या हवाली केले.