यावेळी पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली कार, फायबरचे दांडके, कपडे व उमदी येथील महिलेचे लुटलेले सुमारे १ लाख ४५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले. या गुन्हात ज्ञानेश्वर विठ्ठल घोरपडे (रा. उपळवटे, ता. माढा) व मीना दिलीप पाटील (रा. शिराळा, ता. परांडा) या दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायमूर्ती देशमुख यांनी १३ जानेवारीपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
जवळा (तरंगेवाडी), ता. सांगोला येथील वृद्ध महिलेस कडलास येथे सोडतो असे सांगून कारमध्ये बसविले. नंतर चार अज्ञात चोरट्यांनी तिला मारहाण करून १ लाख २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने काढून घेऊन तिला निर्मनुष्य जागी सोडून दिले. घटना १६ डिसेंबर रोजी घडल्याचा गुन्हा सांगोला पोलीस ठाण्यातला गुन्हा दाखल आहे, दरम्यान, ८ जानेवारी रोजी उमदी पोलीस स्टेशनच्या हद्दीत अशाच प्रकारचा गुन्हा करून ती कार सांगोल्याच्या दिशेने येत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांना मिळाली. त्यामुळे त्यांनी पोलीस पथक पाठवून जत रोड व मिरज रोडवर नाकाबंदी केली. तेव्हा त्या कारने नाकेबंदी चुकवून कडलासकडून सांगोलाच्या दिशेने निघाली होती. पोलीस आधिकारी, कर्मचारी या कारचा पाठलाग करीत होते. दरम्यान, ती कार मांजरी, ता. सांगोला गावातील अशोक शिनगारे व स्थानिक रहिवाशांच्या मदतीने पवारवाडीपर्यंत पाठलाग करून पकडली. कारमधून एकास ताब्यात घेतले, मात्र एक महिला व पुरुष मक्याच्या पिकात पळून गेल्याने पोलिसांनी स्थानिक रहिवाशांच्या मदतीने त्या दोघांचा २ तास शोध घेतला. तेव्हा एक महिला लपून बसलेल्या अवस्थेत दिसली. तिला ताब्यात घेतले, परंतु तिचा साथीदार पळून गेला.
यांनी बजावली ही कामगिरी
ही कामगिरी पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, सहा. पोलीस निरीक्षक बाळासाहेब माने, नागेश यमगर, फौजदार कल्याण ढवणे, फौजदार लतीब मुजावर, आप्पा पवार, प्रमोद गवळी, विजय थिटे, सुनील मोरे, दत्ता वजाळे, सचिन देशमुख, राहुल देशमुख, बाबासाहेब पाटील व महिला होमगार्ड जयश्री नांगरे, बायडा लवटे, नंदा सादिगले यांनी केली आहे.