उडगी : रस्ता निकृष्ट दर्जाचा झाल्याची तक्रार येताच बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांनी उडगी (ता. अक्कलकोट) येथील रस्त्याची तपासणी केली. ग्रामपंचायतीच्या चौदाव्या वित्त आयोगातून जवळपास तीन लाख रुपये मंजूर असलेल्या जय भवानी मंदिराच्या मागील रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याची ओरड सुरू होती.
या निकृष्ट रस्त्याबाबतीत ग्रामस्थांनी ग्रामपंचायत उडगी व गटविकास अधिकारी यांना ग्रामस्थांच्या स्वाक्षरीचे लेखी निवेदन देण्यात आले. सध्या तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू असतानासुद्धा रस्त्याचे काम रात्रीत युद्धपातळीवर आटोपून घेतले. याबाबत सरपंच नारायणकर, शाखा अभियंता बशेट्टी, उपअभियंता ए.ए. खैरदी यांच्याकडे ग्रामस्थांनी तक्रार केली. हा रस्ता अंदाजपत्रकानुसार झालेला नसल्याचा आरोप झाला आहे.
---
मी स्वतः या खडीकरण रस्त्याची पाहणी केली आहे. यामध्ये काही त्रुटी आढळून आल्या असून सरपंचांच्या निर्देशनास आणून दिले आहे. त्याप्रमाणे काम करून घेतले जाईल.
- ए. ए. खैरदी
उपअभियंता, जि. प. बांधकाम उपविभाग, अक्कलकोट
_______
फोटो : १२ उडगी
उडगी येथील रस्त्याची पाहणी करताना उपअभियंता ए. ए. खैरदी.