रेवणसिद्ध जवळेकर
सोलापूर : लग्नात वधू पक्षाकडूनच देण्यात येणारे जेवण केवळ परगावच्या पाहुण्यांसाठीच असावे. स्थानिक लोकांसाठी ‘बाद अक्द के खाने की दावत रद्द होनी चाहिये’ हा संदेश देत बागवान हेल्फ केअर फाउंडेशनने एक पाऊल (पहल) पुढे टाकत वधू पित्याला दिलासा देण्यासाठी पुरोगामी चळवळ सुरु केली आहे. राज्यभरातून समाजातील अनेकांचा या चळवळीस पाठिंबा मिळत असल्याचे फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष नजाकत अली मंद्रुपकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
बागवान समाजातील वधू-वरांचे अक्षता सोहळे मस्जिदमध्ये पार पडले जातात. त्यानंतर वधू पक्षांकडून म्हणजे वधू पित्याने लग्नात सहभागी झालेल्या पाहुण्यांसह समाजातील वºहाडी मंडळींना जेवण देण्याची प्रथा आहे. अनेक वर्षांपासून ही परंपरा चालत आलेली आहे. इतर समाजात वधू अथवा वर पक्षांकडून संपूर्ण लग्नाची जबाबदारी उचलली जाते. वधू पक्षाची आर्थिक स्थिती बिकट असेल तर अशावेळी वर पक्षाकडील मंडळी पुढे सरसावतात. हाच धागा पकडून बागवान हेल्प केअर फाउंडेशनने गेल्या चार-पाच महिन्यांपासून लग्नाच्या प्रथेत बदल करण्याबाबत राज्यातील समाजाला आवाहन केले आहे. वधू पित्याकडे जेवण्याची जबाबदारी टाकण्याऐवजी परिस्थिती पाहून वर पित्यानेही एक पाऊल पुढे टाकत ती जबाबदारी स्वीकारली पाहिजे.
बागवान समाजातील सर्वसामान्य वधू पित्याला भोजनावर दोन ते तीन लाख रुपये खर्च करावे लागतात. किमान ३ क्विंटल तांदळाचा दालचा खाना अथवा बिर्याणी बनवावी लागते. हा संपूर्ण खर्च वधू पित्यालाच उचलावा लागतो. प्रथा म्हणा अथवा समाज काय म्हणेल ? या प्रश्नामुळे वधू पित्याला कर्ज काढून अथवा इतरांकडून तांदूळ, डाळ मागून मुलीचे लग्न उरकावे लागते. आज जमाना बदलला आहे. सर्वच जाती-धर्मांमध्ये पुरोगामीचे वारे वाहू लागले आहेत. बागवान समाजातील ज्येष्ठ मंडळी, डॉक्टर, वकील, राजकारणी, उद्योजक, व्यापारी आदी मंडळी बागवान हेल्प केअरच्या चळवळीत सहभागी होताना त्यांच्या पुरोगामी विचाराला पाठिंबा दिला आहे.
बागवान समाजात नवा प्रवाह सुरु होईल...- ‘बाद अक्द के खाने की दावत रद्द होनी चाहिये...’ हे केवळ स्थानिक समाजबांधवांसाठीच आहे. लग्नात सहभागी झालेल्या परगावच्या पाहुण्यांसाठी जरुर जेवण द्या. मात्र सहभागी झालेल्या स्थानिक लोकांना जेवण देण्याऐवजी चहा, कोल्ड्रिंग, सरबत देण्याचे आवाहन फाउंडेशनने केले आहे. पुरोगामी चळवळीतील हा विचार बागवान समाजातील प्रत्येकाने आत्मसात केल्यास एक नवा प्रवाह समाजात सुरु होईल, अशी अपेक्षा राज्यभरातून समाजातील अनेकांनी नजाकत अली मंद्रुपकर यांच्याकडे फेसबुक, व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. ही चळवळ सत्यात उतरली तर वधू पित्याला दिलासा मिळेल. फार तर वाचलेले पैसे वधूच्या नावावे बँकेत टाकता येतील, असेही काहींनी बोलून दाखवले.
औरंगाबादेतही चळवळ सुरु : नजाकत अली मंद्रुपकरसोलापूरच्या बागवान हेल्प केअर फाउंडेशनने ही चळवळ सुरु केली असून, या चळवळीचे औरंगाबाद येथील बागवान समाज विकास संघटनेचे अध्यक्ष मुसा चौधरी, सदस्य अयुब बागवान, नजीर बागवान, इद्रीस बागवान यांनी जोरदार स्वागत केले आहे. एक कदम हमने बढाये... एक कदम आप भी बढाये असे सांगत औरंगाबादमधील बागवान समाजातील युवकांनी बागवान बिरादरी मे दुल्हनवालों की तरफसे खाने की दावत बंद होचे आवाहन केल्याचे येथील सोलापूरच्या बागवान हेल्प केअर फाउंडेशनचे नजाकत अली मंद्रुपकर यांनी सांगितले.