सोलापूर / आळंद : येत्या १२ मे रोजीच्या मतदानानंतर कर्नाटकात भाजपचे सरकार येणार व मी मुख्यमंत्री म्हणून १८ मे रोजी शपथविधी घेणारच असा आत्मविश्वास भाजपचे कर्नाटक राज्याध्यक्ष व माजी मुख्यमंत्री बी.एस.यडीयुरप्पा यांनी सोमवारी दुपारी आळंदच्या श्रीराम मार्केट मैदानावर आयोजित भाजपच्या निवडणूक प्रचार सभेत जनसमुदायाला उद्देशून बोलताना व्यक्त केले़ मुख्यमंत्री झाल्यानंतर जाहीरनाम्याप्रमाणे विकास योजना राबविण्याबरोबरच कॉंग्रेस नेत्यांच्या भ्रष्टाचार प्रकरणांची चौकशी करून त्यांना कोठे ठेवायचे ते ठरवू असा गर्भित इशारा दिला.
यडीयुरप्पा पुढे म्हणाले की, गेल्या पाच वर्षात कर्नाटकातील सिध्दरामय्या सरकारने प्रचंड भ्रष्टाचार केला असून विद्यमान राज्य सरकारच्या काळात ३८०० शेतकºयांनी आत्महत्या केल्या़ दलितांवर अत्याचार व खूनप्रकरणे वाढली़ तसेच डॉ़ बाबासाहेब आंबेडकरांवर कॉंग्रेसनेच अन्याय केला असून अलीकडे भाजप दलितांच्या मागे ठामपणे उभे आहे. निवडणुक प्रचाराच्या अंतिम टप्प्यात जनमत भाजपच्या बाजूने असल्याचे स्पष्ट होत असून येत्या पाच दिवसात सिध्दरामय्यांच्या सरकारचे पतन होईल व त्यायोगे सिध्दरामय्यांच्या नेतृत्वाखालीच कॉंग्रेसचा सर्वनाश होईल असे भाकीत यडीयूरप्पांनी व्यक्त केले.
विस्तारित भाषणात माजी मुख्यमंत्री बी.एस.यडीयूरप्पा म्हणाले की, भाजपच्या विकासाचा केंद्रबिंदू पंतप्रधान नरेंद्र मोदी असून पक्षाच्या उमेदवारांना मत देणे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी व मलाच दिल्यासारखे होईल तेव्हा आळंद तालुक्यातील आमदार पाटील यांना २० हजाराच्या फरकाने पराभूत करण्याचा मतदारांनी संकल्प करावा. भाजपच्या जाहीरनाम्याबाबत विस्ताराने बोलताना यडीयूरप्पा म्हणाले की, कर्नाटकात भाजपचे सरकार आल्याबरोबर शेतकºयांची १ लाख रूपयापर्यंतची कर्जमाफी, अप्पर कृष्णा प्रकल्पासाठी ५० हजार कोटी रुपयांची तरतूद, पाटबंधारे प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून १.५ लाख कोटी रुपयांची तरतूद, २० लाख अल्पभूधारक शेतकºयांना २ लाख रू कर्जयोजना, शेतमालाला दुप्पट भाव, मुला मुलींचे पदवीपर्यत शिक्षण मोफत, रतयस्नेही योजनेद्वारे राज्यातील तलाव विकासाची योजना, ६ नद्या जोड प्रकल्प, डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेचे संरक्षण, मराठा समाजाला ३ बी. वरून २ ए.वर्गात बदल, जून्या भाग्यलक्ष्मी योजनेत २ दोन लाखांपर्यंत वाढ, तालुक्यातील कोरळ्ळी ओढ्यावर तलाव निर्माण करून आळंदला पाणी पुरवठा करू, सैनिक निवास योजना, रेडीमेड उद्योगास चालना, प्रत्येक गावात शुध्द पाणी पुरवठा, आळंद श्रीराम मार्केट मध्ये कन्नड भवन व वरती पत्रकार भवनचे निर्माण,७५ एकर गायरानावर वृंदावन बागेप्रमाणे पर्यटन स्थळ निर्माण आदी विकास योजना राबविण्यात येतील.
आळंद मतदार संघातून सुभाष गुत्तेदार यांना निवडून आणा त्यांना जवळ घेत उच्च स्थान देऊ असे आश्वासन देत यडीयूरप्पांनी बी.आर.पाटील यांची अनामत रक्कम जप्त करून त्यांचा पराभव करा तरच मला समाधान लाभेल असे मतदारांना आवाहन केले.प्रारंभी भाजपचे उमेदवार सुभाष गुत्तेदार यांनी उपस्थितांचे स्वागत करत प्रास्तविक भाषणात प्रतिस्पर्धी कॉंग्रेसचे उमेदवार बी.आर.पाटील यांच्यावर भृष्टाचाराचे व ढोंगीपणाचे आरोप केले. त्याअगोदर एस.सी.मोचार्चे राज्याध्यक्ष डी.एस.विरय्या, पक्षाच्या अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष मस्तान पटेल, आदिनाथ हिरा,आण्णाराव कौलगा, मराठा समाजाचे राज्य उपाध्यक्ष सुर्यकांत कदम,विरण्णा मंगाणे यांनीही आपल्या भाषणात कॉंग्रेस उमेदवार पाटील यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या.
सुभाष राठोड यांनी सुत्रसंचलन केले.व्यासपीठावर येडीयुरप्पांचा विविध समाज संघटनांकडून विशेष सत्कार करण्यात आला.बी.जी.पाटील,दयानंद शेरीकर,अनंतराज साहू,जि.पं.अध्यक्षा सुवर्णा मलाजी,ता.पं.अध्यक्षा नागम्मा गुत्तेदार, शशिकला टेंगळी, शामराव पॅटी, भीमाशंकर हळीमनी, अशोक सावळेश्वर, संजय मिस्कीन, हषार्नंद गुत्तेदार, असिफ अन्सारी आदी प्रमुख नेते व्यासपीठावर उपस्थित होते.