सोलापूर : महापालिका परिवहन उपक्रमाच्या कर्मचाºयांचा एक महिन्याचा पगार मंगळवारी रोखीने तर उर्वरित एका महिन्याचा पगार पाच दिवसांत देण्याचे आश्वासन महापौर शोभा बनशेट्टी, सभागृह नेते संजय कोळी यांनी दिले. पण मंगळवारी पगार मिळाल्यानंतर सिटी बससेवा सुरू करू, असा पवित्रा कामगारांनी घेतला. त्यामुळे उद्या दुपारपासून सिटी बससेवा पूर्ववत होईल, असा विश्वास परिवहन व्यवस्थापनाकडून व्यक्त करण्यात आला.
नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यातील थकीत पगार मिळावा या मागणीसाठी परिवहन उपक्रमाच्या कर्मचाºयांनी २१ जानेवारीपासून संप सुरू केला होता. परिवहन उपक्रम आर्थिक अडचणीत आहे. कर्मचाºयांच्या पगारासाठी महापालिका प्रशासनाने अंध, अपंग आणि विद्यार्थिनींना देण्यात येणाºया मोफत पासच्या प्रवासाच्या बिलाचे अॅडव्हान्स रक्कम देण्यात यावी, अशी मागणी परिवहन समितीकडून करण्यात येत आहे.
समितीचे सभापती तुकाराम मस्के, नगरसेवक राजकुमार हंचाटे यांच्यासह परिवहन समितीच्या सदस्यांनी महापालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांची तीन-चार वेळा भेटही घेतली,परंतु महापालिकाच आर्थिक अडचणीत असल्यामुळे अॅडव्हान्स देता येणार नाही, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. सिटी बससेवा ठप्प असल्याने शहरासह परिसरातील ग्रामस्थांचे हाल सुरू आहेत. गेल्या १५ दिवसांपासून संपावर असलेल्या परिवहन कामगारांनी मंगळवारी भीक मांगो आंदोलनाचा इशारा दिला.
काँग्रेस, बसपाच्या गटनेत्यांनी या आंदोलनाला पाठिंबा देऊन महापालिकेवर हल्लाबोल करण्याचा इरादा व्यक्त केला होता. यादरम्यान, महापौर शोभा बनशेट्टी, महापालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे, सभागृह नेते संजय कोळी, परिवहन समितीचे सभापती तुकाराम मस्के यांची महापौर कक्षात बैठक झाली. कर्मचाºयांचा एक महिन्याचा पगार करता येईल इतके पैसे प्रशासनाने द्यावेत, अशी मागणी पदाधिकाºयांनी केली. आयुक्तांनी तयारी दाखविल्याची माहिती महापौर शोभा बनशेट्टी यांनी दिली. यानंतर सर्व पदाधिकारी सात रस्ता येथील बसडेपोमध्ये जमले. शिवसेनेचे नगरसेवक अमोल शिंदे, बहुजन समाज पक्षाचे गटनेते आनंद चंदनशिवे येथे पोहोचले.
मंगळवारी एक महिन्याचा पगार करण्यात येईल. महापालिका प्रशासनाकडून अॅडव्हान्सचा चेक आल्यानंतर चार दिवसांत दुसरा पगार करु, असे आश्वासन पदाधिकाºयांनी कामगारांना दिले. उद्या पगार मिळाल्यानंतर सिटी बस डेपोमधून बाहेर काढू, असे कामगारांनी जाहीर केले.
आम्हाला मंगळवारी पगार मिळाला तर आम्ही संप मागे घेण्यास तयार आहोत. मागच्या काळात अशा प्रकारचे आश्वासन देण्यात आले होते, परंतु ते पूर्ण करण्यात आले नव्हते. मंगळवारी पगार मिळाला की सिटी बस बाहेर पडतील. संपाच्या काळात ११ कर्मचाºयांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या नोटिसा मागे घेण्यात याव्यात, अशी मागणी आम्ही करीत आहोत. -देविदास गायकवाड, सदस्य, परिवहन कर्मचारी संघर्ष समिती.
महापालिकेच्या परिवहन उपक्रमाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे. सिटी बससेवा ठप्प असल्यामुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. गेली आठवडाभर आम्ही शासकीय कार्यक्रमांमुळे बाहेरगावी होतो. त्यामुळे कामगारांशी चर्चा करता आली नाही. पण मंगळवारी त्यांना बिल दिले जाईल. परिवहन व्यवस्थेत काही अप्रामाणिक कामगार आहेत. त्यांच्यामुळे ही संस्था कायमची बंद होऊ शकते. भ्रष्टाचार करणाºया कर्मचाºयांना आळा घातला पाहिजे. -शोभा बनशेट्टी, महापौर