अक्कलकोट : सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी धडपड असायची...यात कधी कोरोनाने घेरले कळलेच नाही...तरीही २५ दिवस कोरोनाशी निकराचा लढा दिला...ही लढाई हरत मिरजगी (ता.अक्कलकोट)चे पोलीस पाटील शिवलिंग निंबाळ यांनी जगाचा निरोप घेतला.
सोलापूर जिल्ह्यात पोलीस पाटलांच्या बाबतीत कोरोनाचा पहिला बळी अक्कलकोट तालुक्यात निंबाळ यांच्या रूपाने गेला आहे. ३६ वर्षीय शिवलिंग निंबाळ हे कोरोनाकाळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्न करत होते. गेल्या दोन वर्षांत अनेकांचे प्रश्न त्यांनी सोडवले होते. जनतेची सेवा बजावत असताना त्यांना कोरोनाने कधी घेरले हे कळलेच नाही. त्यांना मागील २० दिवसांपूर्वी कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले. रेल्वे अधिकारी असणारे भाऊ यांनी तात्काळ उपचारासाठी दाखल केले होते. दरम्यान, रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा भासत असल्याने त्यांना विजयपूर येथे नातेवाइकांच्या मदतीने एका हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथून पुन्हा सोलापूर येथे खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. सर्वकाही व्यवस्थित झाल्याने सोमवारी सकाळी आयसीयूमधून जनरल वाॅर्डात दाखल केले होते. या काळात या रुग्णालयातील मृत्यू पाहून ते थोडे घाबरले. त्यावर त्यांच्या भावाने समजूत काढत मनोबल वाढवले होते. अखेर बुधवारी पहाटे ५ वाजता अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, दोन भाऊ असा परिवार आहे.
----
सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याकडे होता ओढा
शिवलिंग निंबाळ यांना सोलापुरातील रुग्णालयातून दोन दिवसांत सोडले जाणार होते. मिरजगीत आल्यानंतर महिनाभर घराच्या बाहेर न पडता प्रकृतीची काळजी घेत कामाचे नियोजनही त्यांनी केले होते. त्यांना सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याकडे ओढा होता. यासाठी शिवलिंग यांच्या भावाने पुढाकार घेतला होता.
---
पहिल्या लाटेत राज्यात दहा पोलीस पाटलांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील संघटनेचे अक्कलकोट तालुक्याचे सहसचिव शिवलिंग निंबाळ यांचा पहिला बळी कोरोनाने गेला आहे. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. त्यांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत मिळवून देऊ. कायदा सुव्यस्था राखणाऱ्या कुटुंबाला शासनाला वाऱ्यावर सोडू देणार नाही, निंबाळ यांच्याही कुटुंबीयांसाठी प्रयत्न सुरू आहेत.
- बाळासाहेब शिंदे-पाटील
राज्याध्यक्ष. म.रा.गा.का.संघटना.
फोटो: ०६ शिवलिंग निंबाळ