सोलापूर : जिल्ह्यातील ६५८ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम २३ डिसेंबर पासून सुरू होणार आहे. त्यापूर्वी बुधवार १६ डिसेंबरला सरपंचपदाच्या आरक्षण सोडत कार्यक्रम नियोजित होता. या आरक्षण सोडत कार्यक्रमाला जिल्हाधिकाऱ्यांनी स्थगिती दिली आहे. ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्यानंतर आरक्षण सोडत होईल, असे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत.
राज्य सरकारच्या सूचनेनुसार आरक्षण सोडत कार्यक्रमाला स्थगिती दिल्याची माहितीदेखील जिल्हा प्रशासनाच्या आदेशात म्हटले आहे. त्यामुळे आता सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीचा मुहूर्त टळला आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर आरक्षण सोडत होणार आहे. याचा धसका अनेकांनी घेतला आहे. याचा जबरदस्त फटका सरपंच पदावर डोळा ठेवून निवडणूक लढवणाऱ्यांना बसणार आहे. जिल्ह्यातील ६५८ ग्रामपंचायती करिता १५ जानेवारीला मतदान होणार आहे. त्यापूर्वी २३ डिसेंबरपासून उमेदवार अर्ज दाखल करता येणार आहे.
३० डिसेंबर पर्यंत उमेदवार अर्ज दाखल करता येणार आहे. आलेल्या उमेदवारांच्या अर्जांची छाननी होऊन ३१ डिसेंबर रोजी अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध होईल. अर्ज माघार घेण्याचा अंतिम दिवस ४ जानेवारी २०२१ राहील. ४ जानेवारी रोजी दुपारी साडेतीन नंतर अंतीम उमेदवारांची यादी प्रसिद्ध होईल. १५ जानेवारीला मतदान होऊन १८ जानेवारीला मतमोजणी होईल.