चपळगाव : खरीप हंगामात अतिवृष्टीतून कसेबसे वाचलेल्या तुरीची रास करण्याचे आव्हान शेतकऱ्यांसमोर होते. मात्र पंजाब राज्यातून अक्कलकोट तालुक्यात हार्वेस्टर मशीनरी दाखल झाल्या आहेत. या मशीनरीमुळे काही मिनिटात एकेका फडाच्या तुरीची रास होते. या मशीनमुळे शेतकऱ्यांच्या वेळेत व खर्चात मोठी बचत होत असल्याचे दिसून येत आहे.
अक्कलकोट तालुक्याच्या उत्तर भागात तूर उत्पादकांनी या मशीनच्या माध्यमातून रास करण्यासाठी धावपळ सुरू केली आहे. वास्तविक पारंपरिक पद्धतीने तुरीची रास करण्यासाठी मजुरांच्या मदतीने अगोदर कापणी करावी लागते. त्यानंतर कापलेले पीक गोळा करून मळणी मशीनच्या साह्याने रास करावी लागते. ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी किमान दोन ते तीन दिवस लागतात. यामध्ये कामास लावलेल्या प्रत्येक मजुराला दिवसाकाठी ३०० ते ३५० रुपये मजुरी द्यावी लागते. एका एकरासाठी जवळपास पाच मजुरांना दिवसभर घेऊन रास करावी लागते. मात्र कमी वेळेत आणि कमी पैशात पंजाबी मशीनवर ही रास पूर्ण होते. पंजाबी मशीनसाठी एकरी १३०० ते १४०० रुपये भाडे घेतले जाते. यामुळे शेतकरी पंजाबी मशीनच्या साह्याने रास करण्यावर भर देत आहेत, असे डोंबरजवळगेचे शेतकरी मुन्ना होदलुरे यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या दृष्टीने तुरीची रास करण्यासाठी पंजाबी हार्वेस्टर मशीन उपयुक्त ठरत आहे. त्यामुळे पंजाबमधील शेतकऱ्यांशी संपर्क ठेवून दरवर्षी मशीन मागवत आहे. याच मशीनद्वारे रास करण्यासाठी प्रतिवर्षी वाढच होत आहे. - विश्वनाथ भरमशेट्टी, शेतकरी, हन्नूर