सोलापूर - आकाश कांबळे व त्याचे तीन मित्र रात्री साडे बाराच्या सुमारास बसस्थानकातील पार्सल विभागाच्या समोरच्या कट्ट्यावर गप्पा मारत बसले होते. त्याच दरम्यान पोलीस गाडीच्या सायरनचा आवाज ऐकायला आला. एवढ्या रात्री पोलिसांनी पकडले तर पंचायत होणार म्हणून हे चौघेही घाबरून पळाले. ही बाब पोलिसांना समजलीसुद्धा नाही.
चौघे पळताना बस स्थानकाच्या आवारात सर्वत्र चिखल व पाणी होते. तिघे पुढे गेले; मात्र पळताना आकाश हा चिखलात पडला, त्याच्या नाका-तोंडात चिखल गेला आणि डोक्याला गंभीर मार लागला. दरम्यान, आकाश आपल्या बरोबर आला नाही, ही बाब लक्षात आल्यानंतर त्याचे मित्र परत आले. त्यांनी त्याला चिखलात पडलेले पाहिले व तो बेशुद्ध दिसला. त्यानंतर त्यांनी त्याच्या घरच्यांना बोलावून घेऊन खासगी दवाखान्यात नेले; परंतु तो मरण पावल्याचे डॉक्टरांनी सांगितले.