सोलापूर : बाणेगाव येथील एका ३५ फूट खोल विहिरीत पडलेल्या म्हशीला सुखरुप बाहेर काढण्यात आले. राहत अॅनिमल संस्था, एनसीएस (नेचर कॉन्झर्वेशन सर्कल सोलापूर) आणि ग्रामस्थांच्या मदतीने म्हशीचा जीव वाचविण्यात आला.
गावातील शेतकरी सागर ढोणे हे शेतातच विहिरीच्या बाजूला असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये होते. रविवारी १९ जुलै रोजी सकाळी नऊ वाजता विहिरीत काहीतरी पडल्याचा आवाज आला. विहिरीजवळ जाऊन पाहिल्यानंतर त्यांना विहिरीत म्हैस पडल्याचे निदर्शनास आले. विहीर ३५ फूट खोल होती. त्यात चार फुटापर्यंत पाणी होते. काही वेळाने त्यांचे बंधू बापू ढोणे यांच्यासह गावातील वीस ते पंचवीस लोक तिथे जमा झाले.
नेचर कॉन्झर्वेशन सर्कलचे सदस्य सुरेश क्षीरसागर, संतोष धाकपाडे, राहत अॅनिमल संस्थेचे डॉ. राकेश चितोड, अजित मोटे आणि सोमनाथ देशमुखे, धनंजय काकडे, उमेश सरगर, चंदन काकडे आणि संजीव माडीवाळ हे अर्ध्या तासात घटनास्थळी पोहोचले. म्हशीला बाहेर काढण्यासाठी बेल्ट, दोरी, जेसीबी मशीन, ट्रॅक्टर आणले.
म्हशीच्या शरीराला दुखापत होऊ नये म्हणून गोधडी व गोणपाटाच्या साहाय्याने गुंडाळून बेल्टच्या साह्याने बांधून घेतले. दोरीच्या साह्याने ट्रॅक्टरने ओढून म्हशीला विहिरीच्या वर काढण्यात आले. याला एक तासांचा वेळ लागला. यासाठी अमित जाधव, आकाश देवकते, पमू ढोणे, कोळी, कुणाल देवकते,पंकज ढोणे, भैय्या कोळी तसेच बाणेगाव येथील नागरिकांनी मदत केली.