अकलूज : भाजप- शिवसेना महायुतीच्या राज्यातील उमेदवारांच्या प्रचारासाठी खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांनी लक्ष घातले आहे. होमपीच असलेल्या माढा मतदारसंघ पिंजून काढल्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार कुल यांच्या प्रचारार्थ तेथील मोहिते-पाटील समर्थकांची बैठक घेतली. आता त्यांनी शिरूर लोकसभेवर आपले लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येते.
माजी खा़ रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केल्याने ते भाजप-सेनेच्या व्यासपीठावर दिसून येत आहेत, परंतु खा़ विजयसिंह मोहिते-पाटील हे अधिकृतरित्या भाजपमध्ये गेले नसले तरी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष माढा, बारामती लोकसभा मतदारसंघात दौरे करुन त्यांनी भाजप-सेना महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी कंबर कसली असल्याचे दिसून येते.
माढा लोकसभा मतदारसंघातील भाजपपासून दूर असलेल्या नेत्यांच्या व प्रमुख कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेऊन त्यांनी जनसंपर्क अभियान राबविले आहे. इंदापूर विधानसभा मतदारसंघाचा दौरा करुन भाजप उमेदवार कांचन कुल यांच्यासाठी त्यांनी सहकार महर्षी कारखान्याचे इंदापूर तालुक्यातील सभासद व कार्यकर्त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन संपर्क वाढविला आहे. शिरुरचे उमेदवार खा़ शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्या शिष्टमंडळाने खा़ मोहिते-पाटील यांची भेट घेतली. अॅड. झंजुरखे, अरुण जोशी, डॉ. रावसाहेब आवटे, माधवराव वाव्हळ, गणपतराव मेटे, शिवाजी परदेशी, मुरलीधर मंडलिक, विजय उंदरे-पाटील, नामदेवराव पानसरे, हरिश्चंद्र सायकर, अरुण जाधव, बाळासाहेब भुजबळ आदींबरोबर त्यांनी बंद खोलीत चर्चा केली.
समर्थकांच्या भेटीशिरुर लोकसभा मतदारसंघात खा. आढळराव यांच्या विरोधात राष्ट्रवादीने डॉ. अमोल कोल्हे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या मतदारसंघात चुरस वाढली आहे. परिणामी या मतदारसंघातही मोहिते-पाटील समर्थक आहेत. त्यांच्या भेटीगाठी घेण्याचे ठरविले आहे़