सोलापूर : कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आमदार विजयकुमार देशमुख यांच्यावरील अविश्वास प्रस्तावावर सह्या करण्यास संचालकांनी नकार दिल्यानंतर या पदाच्या स्पर्धेतून माजी आमदार दिलीप माने यांनी माघार घेतली; पण त्यानंतर इंदुमती अलगोंड - पाटील यांचे नाव पुढे करण्यात आले आहे. दरम्यान, अविश्वास प्रस्ताव बारगळल्याने तूर्त तरी आमदार देशमुख यांच्याकडील सभापतीपद अबाधित राहिले आहे.
आमदार देशमुख यांनी ठरलेला कालावधी पूर्ण होऊन वर्ष झाले तरी राजीनामा दिला नाही. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा व नव्या संचालकांना संधी द्यावी म्हणून मागणी पुढे आली होती. त्यानुसार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी पुढाकार घेतला व वर्षभरापूर्वीच आम्ही त्यांना राजीनामा मागितला होता; पण कोरोना महामारीमुळे प्रकरण लांबणीवर गेले, असे स्पष्ट केले होते. त्यावर सभापती, आमदार विजयकुमार देशमुख यांनी बळीराम साठे व बाळासाहेब शेळके यांनीच मला थांबविले असे स्पष्टीकरण दिले होते. त्यानंतर हालचाली वाढल्या होत्या. माजी आमदार दिलीप माने यांनी जिल्हा परिषदेत साठे यांची भेट घेतली. त्यानंतर हसापुरे व माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर उपसभापती श्रीशैल नरोळे यांचा राजीनामा घेण्यात आला.
माने यांच्या नकारानंतर हालचाली मंदावल्या
या घडामोडीनंतर आमदार विजयकुमार देशमुख हे सभापतिपदाचा राजीनामा देत नाहीत, असे पाहून त्यांच्यावर अविश्वास आणण्याची तयारी सुरू करण्यात आली. नरोळे यांनी राजीनामा दिला; पण अविश्वासाच्या अर्जावर सही केली नाही. हीच भूमिका शेळके व अन्य संचालकांनी घेतली. या घडामोडी घडत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बळीराम साठे यांना फोन करून सभापतिपदासाठी दिलीप माने यांचे नाव सुचविले. मात्र माने यांनी इच्छुक नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर हालचाली मंदावल्या.
डोक्यात दगड घाला; पण...
आमदार विजयकुमार देशमुख यांच्यावर अविश्वास आणण्यासाठी सह्यांची मोहीम सुरू करण्यात आली. प्रकाश चौरेकर यांच्याकडे शिष्टमंडळ गेल्यानंतर डोक्यात दगड घाला; पण मी देशमुख यांच्याविरुद्ध सही करणार नाही, अशी भूमिका घेतल्याचे साठे यांनी सांगितले. त्यामुळे इतकी उठाठेव करून मी विनाकारण तोंडघशी पडलो, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. दगडापेक्षा वीट मऊ या उक्तीप्रमाणे कोणाला उपद्रव नसणारे आमदार देशमुख हेच सभापतीला योग्य आहेत असे आता साठे यांनी म्हटले आहे.
इंदुमती अलगोंड यांचे नाव
सभापतिपदाला माजी आमदार दिलीप माने यांनी मी इच्छुक नाही, असे स्पष्ट केल्यावर इंदुमती अलगोंड यांचे नाव चर्चेत आले आहे. पण साठे यांनी अविश्वास तर दाखल करणार नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे देशमुख यांनी राजीनामा दिला तर अलगोंड यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल, असे समन्वय समितीतील सदस्यांचे म्हणणे असल्याचे सांगण्यात आले.
उपसभापतिपदाची लॉटरी कोणाला?
उपसभापती श्रीशैल नरोळे यांनी माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्याकडे राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा सभापती विजयकुमार देशमुख मंजूर करू शकतात. नरोळे यांचा राजीनामा मंजूर केला, तर उपसभापतिपदी कदाचित जितेंद्र साठे यांची वर्णी लागेल, असे सांगितले जात आहे.