सोलापूर - शासनाने दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर मंदीरे उघडण्याचे जाहीर केल्यानंतर येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे स्वामी समर्थांचे मंदीरही आजपासून दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर भाविकांसाठी उघडण्यात आले. आठ महिन्यांपासून स्वामींच्या दर्शनासाठी आतुर झालेल्या भाविकांनी आज पहाटेपासूनच स्वामींच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी रांगा लावल्या होत्या.
स्वामींचे राज्यभरात लाखो भक्त आहेत. आज दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर स्वामींचे भक्त मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी दाखल झाले आहेत. जवळपास 8 महिन्यांनंतर झालेल्या दर्शनामुळं भक्तांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळल्याचं चित्र इथं पाहायला मिळालं.
दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर आजपासून राज्यातील सर्व मंदिरं सुरु करण्यात आली आहेत. अक्कलकोटचं वटवृक्ष स्वामी समर्थांचं मंदिरंही आजपासून भाविकांसाठी उघडं करण्यात आलं. आठ महिन्यांपासून स्वामींच्या दर्शनासाठी आतुर झालेल्या भाविकांनी आज पहाटेपासूनच स्वामींच्या चरणी लीन होण्यासाठी रांगा लावल्या होत्या. यावेळी काही भाविकांच्या डोळ्यात आनंदाश्रू पाहायला मिळाले.
अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे, मंदार पुजारी यांच्या हस्ते आज पहाटे ५ वाजता मंदिराचा दरवाजा उघडण्यात आला. मंदिर उघडण्यात आल्यावर स्थानिक नागरिकांसह अन्य जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांनी स्वामींचं दर्शन घेत समाधान आणि आनंद व्यक्त केला. एका तासात अंदाजे १०० भाविक दर्शन घेवून सुखरूप बाहेर निघतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांच्या सोईकरीता मंदीर समितीच्या वतीने मंदीरातील परिसरात विविध ठिकाणी सॅनिटायझरची सोय केली आहे.
भाविकांना मंदीरात प्रवेश करत असताना आपापल्या मास्कचा व सॅनिटायझरचा वापर करण्याबाबत या प्रसंगी मार्गदर्शन करण्यात आले. या प्रसंगी मंदीर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, संजय पवार, श्रीशैल गवंडी, अविनाश क्षीरसागर, संतोष पराणे, प्रसाद सोनार, मल्लीनाथ स्वामी, सिध्दू कुंभार, कल्याणशेट्टी व इंगळे कुटूंबीयांसह अनेक भाविक उपस्थित होते.