झेडपी निवडणूक प्रचारात सैनिक पत्नीविषयीच्या वक्तव्याने आ. परिचारक वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. त्यांना निलंबनाचा सामनाही करावा लागला. त्यामुळे आमदारकी असूनही व समोर स्व. भारत भालके यांच्यासारखे आक्रमक नेतृत्व असल्यामुळे त्यांना फारसे काम करता आले नाही. मात्र स्व. भारत भालके यांच्या निधनानंतर लागलेल्या पोटनिवडणुकीत मात्र त्यांनी अनपेक्षितपणे वेगळी चाल खेळली, दोन पावले मागे घेत समाधान अवताडे यांना पाठिबा दिला. योग्य नियोजन करून त्यांनी सहानुभूतीच्या लाटेतही समाधान अवताडे यांना निवडूनही आणले. त्यामुळे गेल्या १२ वर्षांपासून बॅकफूटवर असलेले आ. प्रशांत परिचारक अचानक फ्रंटफूटवर आले.
पंढरपूर पोटनिवडणूक झाल्यानंतर त्यांनी दुसऱ्याच दिवशी नवनिर्वाचित आ. समाधान अवताडे यांना सोबत घेत पंढरपूरमध्ये अधिकाऱ्यांसोबत कोरोना आढावा बैठक घेतली. सुविधा देण्यासाठी हालचाली चालू केल्या. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची जिल्ह्यातील प्रमुख आमदार, खासदार व पदाधिकाऱ्यांसह भेट घेऊन पोटनिवडणुकीतील विजयाची शाबासकी मिळवली. सोलापूरमधील भाजपचे आंदोलन, मंगळवेढ्यात मराठा आरक्षणासंदर्भात ठिय्या आंदोलन, म्हैसाळ योजनेचे पाणीपूजन करून सक्रिय राजकारणात स्वतःला मध्यभागी ठेवले आहे. त्यामुळे विधान परिषद आमदारकीच्या शेवटच्या टप्प्यात आ. परिचारक यांच्या बदलत्या भूमिकेची जोरदार चर्चा आहे.
उजनीच्या पाण्यावरून राष्ट्रवादीला टार्गेट
उजनीचे सोलापूरच्या हक्काचे ५ टीएमसी पाणी इंदापूरला नेण्याचा घाट पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आखला आणि त्यानंतर जिल्ह्यात सर्वपक्षीय आंदोलने झाली. यावेळीही आ. परिचारक यांचे आक्रमक धोरण कायम राहिले. त्यांनी सोलापूर व पंढरपूरमध्ये सर्व आमदार, खासदारांना सोबत घेऊन आंदोलने केली व आदेश रद्द झाल्यानंतर जिल्ह्यातील राहिलेली राष्ट्रवादी वाचविण्यासाठी हा आदेश रद्द केल्याची बोचरी टीका केली.
विजयानंतर ठोकलेल्या 'शड्डू'वरही आक्रमकता
पोटनिवडणूक विजयानंतर ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्व. भारत भालके यांनी शड्डू ठोकला होता, त्याच ठिकाणी आ. प्रशांत परिचारकांनी शड्डू ठोकत प्रतिउत्तर दिले होते. त्यानंतर त्यांच्यावर काहीजणांनी टीका केली. मात्र त्यालाही त्यांनी उत्तर देत ८५ वर्षाच्या व्यक्तीविरोधात शड्डू ठोकलेला चालतो, मग आम्ही का नाही अस उत्तर दिलं. भगीरथ भालके यांच्यावर टीका करताना राजकारणात मस्ती, अहंपणा चालत नाही असे म्हणत आम्हाला संपविणारे स्वत: संपले. आम्ही तिथंच आहोत, असे म्हणत उत्तर दिले. त्यानंतर जे कोणी त्यांच्यावर टीका करतील त्यांना तेवढ्याच आक्रमकतेने उत्तर देताना दिसत आहेत.