माढा : येथून बारामतीच्या तीनशे किलोमीटर प्रवासाचे अंतर पार करून विशाल शहा यांनी आपली सासू सुनीता दोशी यांच्या मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प पूर्ण केला. यामुळे दोन अंधांना दृष्टी मिळाली़ आपले दु:ख बाजूला ठेवून सामाजिक जाणिवेच्या भावनेतून या परिवाराने केलेली ही धडपड कौतुकाची ठरली.
बारामती येथील सुनीता दोशी वय ८५ यांचे रविवारी सायंकाळी निधन झाले. त्यांचे जावई विशाल शहा-एकबोले माढ्याला असतात. त्यांना रात्री ही बातमी कळताच सासूने केलेल्या मरणोत्तर नेत्रदानाची आठवण झाली. मात्र रविवार सुटीचा दिवस असल्याने बारामतीत नेत्रदान करणे अशक्य होते. शहा यांनी माढ्यातील डॉक्टरांना विचारणा केली असता डॉ.अशोक मेहता यांनी नेत्रपटल काढण्यासाठी माढ्यातून बारामती येथे जाण्याची तयारी दर्शविली. सासूच्या नेत्रदानासाठी जावई विशाल शहा यांनी केलेली धडपड व त्यांना मिळालेली ६८ वर्षांचे डॉ. मेहता यांची साथ कौतुकास्पद ठरली़ त्यांचे वडील विलास शहा यांनी स्वत:च्या पत्नीचे देहदान केले .
असा झाला प्रवास- विशाल शहा-एकबोले यांनी डॉ. मेहता यांना बरोबर घेऊन रात्री माढ्यातील सन्मती नर्सिंग होम येथील डॉ. रमण दोशी यांच्या दवाखान्यातून नेत्रदानासाठी आवश्यक असणारी साधने घेतली.माढा ते बारामती असा सुमारे दीडशे किलोमीटरचा प्रवास करून पहाटे दोनच्या सुमारास ते बारामतीला पोहोचले. त्यानंतर डॉ. मेहता यांनी नेत्रपटल काढण्याची प्रक्रिया केली.
- दरम्यान सोलापुरातील डॉ. नवनीत तोष्णीवाल यांच्याशी पुढील प्रक्रियेसाठी संपर्क झाला होताच. त्यानुसार पहाटेच एका वाहनातून हे नेत्रपटल सोलापुरात डॉ. तोष्णीवाल यांच्या रुग्णालयात पोहोचविण्यात आले. दोन अंध रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करून नेत्रपटलाचे प्रत्यारोपण करण्यात आले. त्यामुळे या दोघांना दृष्टी मिळाली.