आप्पासाहेब पाटील
सोलापूर : एक नव्हे..दोन नव्हे तर सात दिवस रोज दिवसा, रात्री अन् पहाटे लॅपटॉप विसरलेली तक्रार घेऊन पोलीस रिक्षाच्या शोधात... पोलिसाची सर्वच रिक्षा स्टॉपवरील चालकांशी विचारणा...एवढेच नव्हे गुन्हा दाखल करण्याचीही तंबीही पोलिसांनी शोध मोहिमेत रिक्षा चालकांना दिली.. सात दिवसांच्या प्रयत्नानंतर त्या रिक्षाबद्दलची गोपनीय माहिती पोलिसांना दिली. पोलीस येणार याबाबतची माहिती मिळताच त्या रिक्षा चालकाने संबंधित व्यापाऱ्याला सर्व साहित्यांसह ती बॅग परत करून पोलिसांना खबर दिली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, प्रतीक दीपक कोकरे (वय २८, रा. इंदिरा नगर, विजापूर रोड, सोलापूर) हा २९ नोव्हेंबर २०२१ रोजी पहाटे पुण्याहून सोलापुरात आला. सोलापुरात पुणे नाका येथे खासगी बसमधून उतरून रिक्षाने घरी पोहोचला. घरी पोहोचल्यानंतर लॅपटॉप व इतर महत्त्वाची कागदपत्रे असलेली बॅग रिक्षात विसरल्याचे लक्षात आले. खूप प्रयत्न करूनही रिक्षाचालक आढळून आला नाही. त्यामुळे संबंधित प्रतीक कोकरे याने नवीवेस पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलीस नाईक विठ्ठल पैकेकरी व पोलीस कॉन्स्टेबल सुधाकर माने यांनी दहा दिवस रोज दिवसा, रात्री अन् पहाटे त्या रिक्षा चालकाचा शोध घेऊन संबंधित व्यापाऱ्यास ती बॅग परत केली.
----------
फक्त पहाटेच रिक्षा चालवायचा म्हणून...
संबंधित रिक्षात विसरलेल्या बॅगचा चालक ती रिक्षा फक्त मध्यरात्री अन् पहाटेच्या सुमारासच चालवायचा. त्यामुळे पोलिसांना त्या रिक्षाचालकाचा शोध घेण्यासाठी सात दिवस लागले. सात दिवसानंतर तो रिक्षाचालक आढळून आला अन् ती हरविलेली बॅग, बॅगेतील लॅपटॉप, घराच्या चाव्या, कपडे, चार्जर, नवीन बूट असलेली बॅग संबंधितास परत दिली.
-----------
पोलीस कर्मचारी पैकेकरी, मानेंचा सन्मान...
हरविलेली बॅग शोधून देण्यासाठी सात दिवस अन् रात्र तपास करून रिक्षात विसरलेली बॅग परत मिळवून दिल्याबद्दल पोलीस नाईक विठ्ठल पैकेकरी व पोलीस कॉन्स्टेबल सुधाकर माने यांचा फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र बहिरट यांनी सन्मान केला. दरम्यान, प्रामाणिकपणाबद्दल पैकेकरी व माने यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.