नासीर कबीर
करमाळा : निवडणूक लोकसभेची होणार असली तरी करमाळ्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या तिकिटाचीच चर्चा सुरू आहे. माढ्यातून शरद पवार यांच्या उमेदवारीमुळे करमाळ्यात मामा की दीदी हाच विषय चर्चिला जात आहे.
अनेक नाट्यमय घडामोडीनंतर अखेर माढा लोकसभा मतदारसंघातून राष्टÑवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. माढा लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या करमाळा विधानसभा मतदारसंघात पवारांच्या उमेदवारीमुळे राष्टÑवादी काँग्रेसच्या तिकिटाची चर्चा रंगली आहे. करमाळ्यात एकमेकांच्या विरोधात राजकारण करीत असलेले झेडपीचे अध्यक्ष संजय शिंदे व रश्मी बागल या दोघांनी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष पवारांच्या उमेदवारीचे समर्थन केले आहे.
माढा तालुक्यातील पिंपळनेर येथील स्नेहल लॉन्समध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये माढा लोकसभा मतदारसंघातील करमाळा, माढा, सांगोला, माळशिरस तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यास झेडपी अध्यक्ष संजय शिंदे उपस्थित नव्हते. पण त्या अगोदर निमगाव येथे आ.बबनदादा श्ािंदे यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाच्या निमित्ताने आलेल्या पवारांचे स्वागत संजय शिंदे यांनी केले.
तत्पूर्वी संजय शिंदे यांनी पुणे येथे अजितदादांच्या साक्षीने १८ फेब्रुवारी रोजी शरद पवारांची सदिच्छा भेट घेतली होती हे लपून राहिले नाही. पिंपळनेरच्या मेळाव्यास आवर्जून उपस्थित असलेल्या रश्मी बागल यांनी मेळाव्यानंतर पवारांच्या बरोबर गाडीत बारामतीच्या गोविंदबागेपर्यंत प्रवास केला. या प्रवासादरम्यान लोकसभा निवडणुकीबरोबर विधानसभा निवडणुकीची चर्चा झाल्याचे रश्मी बागल यांनी सांगितले.
झेडपीत भाजपाच्या सहकार्याने अध्यक्ष झालेले संजय शिंदे आज राष्टÑवादी काँग्रेसमध्ये नाहीत तरीही सोशल मीडियावर संजय शिंदे आगामी विधानसभा निवडणुकीत करमाळ्यातून राष्टÑवादी काँग्रेसचे तिकीट फिक्स असल्याची चर्चा सुरू आहे. दुसरीकडे रश्मी बागल या स्व. दिगंबरराव बागल यांच्यापासून एकनिष्ठ असल्याने व गत विधानसभा निवडणुकीत त्यांचा अवघ्या २५७ मतांच्या फरकाने निसटता पराभव झाल्याने रश्मी बागल यांना राष्टÑवादीची उमेदवारी मिळेल असा ठाम विश्वास कार्यकर्ते व्यक्त करीत असून सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
जयवंतरावांकडे सर्वांचे लक्ष- कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राडा झाल्यानंतर माजी आ.जयवंतराव जगताप यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याने ते जामिनासाठी प्रयत्नात आहेत. जगतापांना कधी जामीन मिळणार व ते कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत.