मोहोळ : रोजीरोटीसाठी कोरोना कालावधीत काम करूनही उपासमारीला तोंड द्यावे लागत आहे. प्रश्नाची सोडवणूक करा या मागणीसाठी तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी पंचायत समितीच्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले होते. दरम्यान, रिमझिम पावसात कार्यालयासमोर बसलेले कर्मचारी आपलेच आहेत, या भावनेतून गटविकास अधिकारी गणेश मोरे यांनी कर्मचाऱ्यांना बोलावून तुमचे प्रश्न १५ दिवसांत मार्गी लावू, अशी ग्वाही देताच उपोषण थांबविण्यात आले.
आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष तानाजी ठोंबरे यांचे नेतृत्वाखाली पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले होते.
१० ऑगस्ट २०२० च्या परिपत्रकानुसार सुधारित वेतन मिळावे. किमान वेतन व महागाई भत्ता यातील फरकाची रक्कम मिळावी. सर्व कर्मचाऱ्यांना राहणीमान, महागाई भत्ता मिळावा. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसंदर्भातील सेवा पुस्तके व इतर सर्व रजिस्टर माहितीसह अद्ययावत करावीत. जलरक्षक यांचे मानधन त्वरित मिळावे. ग्रामपंचायत कर्मचारी यांना विमा संरक्षण मिळावे. शासन परिपत्रकाप्रमाणे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यासाठी असणाऱ्या न्याय्य मागण्यांची पूर्तता तात्काळ करावी या मागणीसाठी उपोषण सुरू केले होते. यावेळी संघटनेचे अध्यक्ष दत्ता पाटील, शिवाजी भालेराव, मनोज कांबळे, ज्ञानेश्वर खजूरकर, मनोहर कांबळे,
दादासाहेब वाघमारे, श्रीमंत जाधव, तुकाराम क्षीरसागर, विठ्ठल राठोड, आकाश होमकर, गैबी साहेब मुल्ला आदी उपस्थित होते. ---
फोटो : ११ मोहोळ आंदोलन
पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणास बसलेले ग्रामपंचायत कर्मचारी.