सोलापूर : पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिर संवर्धनाचे काम पूर्ण झाल्याने मंदिराचे प्राचीन सौंदर्य खुलू लागले आहे. रविवारी पहाटेपासून विठ्ठल रखुमाईचे पदस्पर्श दर्शन सुरू झाले आहे. अडीच महिन्याच्या कालावधीनंतर पददर्शन सुरू झाल्याने मंदिरात फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे.
रविवारी सकाळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पंढरपूर येथे श्री. विठुराया आणि रखुमाईचे सपत्नीक दर्शन घेतले. श्री. विठ्ठलाची कृपा सदैव महाराष्ट्रावर राहो, सर्वांना सुख, समृध्दी आणि आरोग्य लाभो अशी प्रार्थना विठुरायाचरणी केली.
जतन व संवर्धनाच्या कामामुळे मंदिर अडीच महिने बंद होते. मात्र, आजपासून पंढरपूरचे श्री. विठ्ठल मंदिर भक्तांसाठी पूर्ववत खुले करण्यात आले आहे. आज संवर्धनाच्या कामानंतर श्री विठुराया आणि रखुमाईच्या मनमोहक रूपाचे दर्शन घेण्याचे भाग्य लाभल्याने अतीव आनंद झाला असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.