पंढरपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी आणि दिंड्यांनी चंद्रभागा नदी, पुंडलिकाचे दर्शन घेत नगरप्रदक्षिणा पूर्ण केली.
पंढरीत आल्यानंतर ज्याप्रमाणे विठ्ठलाच्या दर्शनासाठी जेवढे महत्त्व आहे, तेवढेच महत्त्व चंद्रभागा स्नानाला आहे. यंदाच्या माघी यात्रेत आलेल्या छोट्या-छोट्या दिंड्या चंद्रभागा वाळवंटात आल्या. परवानगी असलेल्या दिंड्यांनी चंद्रभागेत स्नान करून पुंडलिकाचे दर्शन घेऊन हरिनामाचा गजर करत आपली नगरप्रदक्षिणा पूर्ण केली.
पंढरीत भाविकांची गर्दी होऊ नये. यासाठी पोलीस प्रशासनाने १६०० पोलिसांचा बंदोबस्त लावला आहे. कडक नाकाबंदी असल्यामुळे मंदिर परिसरात भाविकांनी गर्दी केली नाही. यामुळे भाविकांनी सदैव गजबजलेला मंदिर परिसर रिकामा होता. त्याचबरोबर कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने पंढरपुरात संचारबंदी केल्यामुळे इतर जिल्ह्यांतून दिंड्या आल्या नाहीत. काही मोजक्या परंपरागत दिंड्यांनी यात्रा पूर्ण केली. यामध्ये स्थानिक दिंड्यांचा सहभाग होता. या दिंड्या आपल्या मठापासून काही मोजक्या वारकऱ्यांसह निघाल्या. त्या प्रत्येक दिंड्या चंद्रभागेत पोहोचल्या, परंतु त्यांनी चंद्रभागेत स्नान केले नाही. पुंडलिक दर्शन घेऊन, विठ्ठल मंदिराच्या कळसाचे दर्शन घेऊन प्रदक्षिणा मारून आपली माघी यात्रेची परंपरा पूर्ण केली.
माघी एकादशीची श्री विठ्ठलाची पूजा करण्याचा मान मंदिर समितीच्या महिला सदस्या ॲड. माधवी निगडे यांना मिळाला तर रुक्मिणी मातेची पूजा सदस्य ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांनी केली. यावेळी मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह. भ. प. गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, सदस्या शकुंतला नडगिरे, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात फुलांची सजावट करण्याचे आयोजन मंदिर समितीने केले होते. वडगाव धायरी (पुणे) येथील श्रीमंत मोरया ग्रुपच्या वतीने उद्योजक सचिन चव्हाण, संदीप पोकळे, प्रकाश पोकळे यांनी मंदिरातील फुलांच्या सजावटीचा खर्च करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांनी विठ्ठल व रुक्मिणी गाभाऱ्यात फुलांची सजावट केली. या सजावटीसाठी झेंडू, शेवंती, ग्लॅडिओ, ऑरकेड, ब्लूडीजे, सँगोप ड्रेसिना अशा ५० हजार रुपयांच्या १ टन फुलांचा वापर करण्यात आला. यामुळे मंदिरात प्रसन्न व भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.