महेश कोटीवाले वडवळ : ‘काहीही होवो सत्तेची खुर्ची आपल्याच घरात राहिली पाहिजे’ या व अशा अनेक इच्छेपायी राज्यात सर्वत्र ग्रामपंचायतीच्या निवडणुका चुरशीने लढवल्या गेल्या. वडवळ ग्रामपंचायतीमध्ये ६५ वर्षातून प्रथमच अनुसूचित जातीच्या जागेसाठी सरपंच पद आरक्षण जाहीर झाले अन एका साखर कारखान्याचे माजी चिटबॉय जालिंदर बनसोडे हे आता सरपंच म्हणून निश्चीत झाले आहेत.
वडवळ ग्रामपंचायतीची स्थापना १९५६ साली झाली व निवडणूक आयोगाकडून ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपद आरक्षण प्रक्रिया ही १९९५ पासून सुरु झाली. या एकूण ६५ वर्षाच्या कालावधीत प्रत्येक निवडणुकीमध्ये अनुसूचित जातीचे उमेदवार निवडून येत होते मात्र त्यांना कधी सरपंच पदाच्या खुर्चीवर बसण्याची संधी मिळाली नाही. वडवळ ग्रामपंचायतीच्या गाव कारभाऱ्यांनी बिनविरोध निवडणूक करून एक आदर्श निर्माण केला होता. दोन्ही गटाकडून अनुसूचित जातीच्या जागेसाठी जालिंदर बनसोडे यांची निवड करण्यात आली. बनसोडे यांनी यापूर्वी उपसरपंच पदावर काम केले आहे. तालुक्यातील एका साखर कारखान्यामध्ये त्यांनी चिटबॉय म्हणून काम केले आहे. आता त्यांना गावचे सरपंच पद भूषवण्याची संधी मिळाली आहे. त्यांची बिनविरोध निवड होताच गावात विविध व्यक्ती,संस्था यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचा व लोकशाहीचा हा विजय आहे. गावाचा विकास करण्यासाठी मिळालेल्या संधीचे सोने करून दाखवू. सर्वांना सोबत घेऊन विकास काम करण्यावर आपला भर असेल. - जालिंदर बनसोडे, सरपंच उमेदवार, वडवळ.