अय्युबखान शेख
माढा : केवड येथील महारुद्र विश्वनाथ चव्हाण व गणेश महारुद्र चव्हाण या अॅपल बोर उत्पादक शेतकºयांनी निसर्गाच्या अवकृपेला वैतागून सोळाशे झाडांची ही बागच तोडून काढली.
माढा तालुक्यातील सीना नदीलगतच असणाºया केवड या गावातील विहीर आणि बोअरवेलला पाणी टिकत नसल्याने या दोन्ही भावांनी ऊसशेतीमध्ये ऊस न लावता २०१४ मध्ये शेतीतील पाच एकरांत अॅपल बोरीची बाग लावली होती. बँकेचे कर्ज घेऊन बाग जोपासली. संपूर्ण बागेला ठिबक करून सेंद्रिय खताचा वापर केला. दहा ते बारा टन एकरी उत्पन्न घेतले. एका वर्षी तर साठ टनाचे विक्रमी उत्पन्न घेतले. सोलापूरसह नाशिक, नांदेड, गुजरात, ओरिसा या ठिकाणी बोरं विक्रीला जायची. परिसरातील शेतकरी अॅपल बोरासाठी या शेतकºयांचे मार्गदर्शन घेत असत.
उत्पादन आणि गुणवत्ता लक्षात घेऊन अॅपल बोर निर्यात करण्याचा त्यांचा मानस होता. अॅपल बोरचा किमयागार असा पुरस्कारही या शेतकºयाला मिळाला होता. पहिल्या वर्षी २५ लाख, दुसºया वर्षी १५लाख तर तिसºया वर्षी १० लाख उत्पन्न मिळाले. यावर्षी उत्पन्न वाढण्याची अपेक्षा असताना निसर्गाने बदललेल्या वातावरणाचा फटका दिला. बदललेल्या वातावरणामुळे फळांत कीड पडली. यामुळे बाजारपेठेत दर घटला. बँकेच्या कर्जाचे हप्ते भरणेही यंदा कठीण झाल्याचे लक्षात आल्याने व भविष्यातही अशीच स्थिती राहिली तर कर्जाचा बोझा पुन्हा वाढण्याच्या शक्यतेने या शेतकºयाने शेतातील सर्वच अॅपर बोरची झाडे कापून काढली.
एकीकडे दुष्काळ तर दुसरीकडे पडलेला भाव. यामुळे शेतकरी पार हादरून गेला आहे. अॅपल बोरपासून भरपूर उत्पन्न मिळाले. पण यंदा पावसाअभावी बाग काढण्याची वेळ आली. पण बाग काढताना फार वाईट वाटत आहे.-गणेश चव्हाण, बोर उत्पादक