सोलापूर : शहर व जिल्ह्यातील ऑर्केस्ट्राबारच्या नावाखाली चालणारे डान्सबार बंद करण्यात यावेत. संबंधित मालकांवर गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी मातंग एकता आंदोलन संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद येथील पुनम गेट समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. ऑर्केस्ट्राबारची परवानगी असताना डान्सबार चालवले जात आहेत. अवैध दारू विक्री चालू असल्याचे दिसून येत आहे. सर्व ऑर्केस्ट्राबार मालकांना करमणूक कर अधिकाऱ्यांनी व संबंधित सर्व विभागाने नोटीसा दिल्या आहेत. कारवायाही करण्यात आल्या आहेत, मात्र तरीही डान्सबार चालुच आहेत. सर्व डान्सबार हे कोणत्या ना कोणत्या राजकीय नेत्यांच्या अश्रयाखाली चालत आहेत. मात्र कायदा हा सर्वांना समान आहे. बारमालकाची राजकीय व गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासून संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत. रात्री अपरात्री पर्यंत हे डान्सबार सुरू आहेत. काही ठिकाणी पहाटे पर्यंत बार चालू असतो. बारमध्ये गेलेले ग्राहक रात्री मद्यप्राशन करून बाहेर पडतात. नशेत अपघात होतात, अनेकांचे प्राण गेले आहेत. शिवाय ऑर्केस्ट्रा बारच्या ठिकाणी पैसे उडवण्याच्या कारणावरून, आतील नृत्यांगणांच्या कारणावरून सतत वाद व हणामारीसारख्या घटना घडत असतात. यातून गुन्हेगारी वाढत चालली आहे. या प्रकाराला आळा बसला पाहिजे आदी मागण्या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आल्या आहेत. मातंग एकता आंदोलन संघटनेचे शहराध्यक्ष रोहित खिलारे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू झाले आहे.
डान्सबार बंद करून मालकांवर गुन्हे दाखल करा! मातंग एकता आंदोलन संघटनेच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन
By संताजी शिंदे | Updated: June 25, 2024 18:44 IST