ठळक मुद्दे- मागण्या मान्य करून घेण्यासाठी शिक्षक आक्रमक- जिल्हा परिषद व जिल्हा प्रशासनाला दिले निवेदन- आंदोलनावेळी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी
सोलापूर : शासनाकडे प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी राज्य आदर्श शिक्षक समितीच्यावतीने सोलापूर जिल्हा परिषदेच्या पूनम गेटसमोर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात कृती समितीचे जिल्हाध्यक्ष राजकुमार राऊत, महिला अध्यक्षा भाग्यश्री सातपुते यांच्यासह जिल्ह्यातील शिक्षकांचा सहभाग होता.
या आहेत मागण्या...
- शिक्षणविस्ताराधिकारी, केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांची रिक्त पदे ही पदोन्नतीने तातडीने पूर्ण करावे़
- संच मान्यतेप्रमाणे विषय शिक्षक कार्यरत ठेवण्यासाठी विज्ञान विषय शिक्षकांचे समुपदेशनाने नेमणुका द्याव्यात व समाजशास्त्र विषय शिक्षकांना वेतन संरक्षण देऊन शासन निर्णयाप्रमाणे कार्यवाही करावी
- अंशदायी पेन्शन योजनेत कार्यरत असणाºया शिक्षक कर्मचाºयांच्या सातव्या वेतन आयोगाचा पहिला हफ्ता शासन निर्णयाप्रमाणे जुलै २०१९ महिन्यातील वेतनातून रोखीने आधार करण्यात यावा, तसेच डीसीपीएस धारकांची हिशोब चिठ्यांची दुरूस्ती करावी, आंतरजिल्हा बदली झालेल्या डीसीपीएस धारकाची रक्कम संबंधित जिल्हा परिषदेला वर्ग करावी.
- विषय शिक्षकांना मंजूर केलेली वेतनश्रेणी सोलापूर जिल्हा परिषद आदेशाच्या तारखेऐवजी शासन निर्णयाच्या किंवा वेतनश्रेणी पद स्वीकारण्याच्या तारखेपासून देण्यात यावी.
- २८ मे २०१९ च्या शासन निर्णयाप्रमाणे न राबवलेल्या २५ जुन २०१९ च्या बदली समुपदेशन प्रक्रियेमुळे ज्यांची गैरसोय झाली आहे त्यांच्या तात्काळ सोयी करण्यात याव्यात.