सोलापूर : मागील दोन वर्षांपासून कलावंत मानधन समिती गठित झाली नाही. ७ फेब्रुवारीपर्यंत समिती गठित न झाल्यास आंदोलन करू, असा इशारा सोलापूर जिल्हा लोककला संघटनेने दिला आहे. महापालिकेच्या हिरवळीवरील झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला.
संघटनेच्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्यात येणार आहे. त्यानंतरही कारवाई न झाल्यास फेब्रुवारीच्या अखेरच्या आठवड्यात आंदोलन करण्याचा इशारा दिला. या बैठकीत शाहीर, गोंधळी, वाघ्या-मुरळी, पोतराज, नाट्य कलाकार, धनगरी ओवी, भजन, भारूड आदी कलाकार उपस्थित होते.
वृद्ध कलावंत मानधन समितीचे सदस्य निवडीचा अधिकार हा पालकमंत्री यांना असतो. या समितीत फक्त कलाकारांचीच निवड केली जाते. २०२२ रोजी निवडलेल्या समितीचे तीन वर्षे पूर्ण झाले. तेव्हापासून ही समिती स्थापन केलेली नाही. त्यामुळे समिती स्थापित करावी, अशी मागणी बैठीकत करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी डॉ. अजीज नदाफ, डॉ. महादेव देशमुख, संघटनेचे अध्यक्ष बापू पटेल, सुरेश बेगमपुरे, यल्लप्पा तेली, रामकृष्ण सावंत, शिवाजी गंगवणे, नागनाथ परळकर, बजरंग घुले आदी उपस्थित होते...या आहेत मागण्या
कलाकर मानधनात किमान ५ हजार रुपये वाढ करावी, २०२० पासून कलावंतांचे प्रलंबित प्रस्ताव मंजूर करावे, नाट्य परिषद तमाशा परिषदेप्रमाणे लोककलावंतांची परिषद दरवर्षी सर्व जिल्ह्यात घ्यावी, अशी मागणी संघटनेतर्फे करण्यात आली.