भारतीय समाजव्यवस्थेचा कणा असणारी भारतीय शेती आहे. पूर्वी ‘उत्तम शेती मध्यम व्यापार कनिष्ठ नोकरी’ ही समाजस्थिती होती. शेतीमालाला मोत्याचं मोल नसलं तरी शेतीला सन्मान, प्रतिष्ठा व शेतकºयांना मानसन्मान होता. गावगाडा आनंदाने चालायचा पण ‘कालाय तस्मै नम:’ म्हणतात ते काही खोटं नाही. काळाचे फासे उलटे पडले, माणसाच्या वागण्या बोलण्यात बदल होत गेला, अधिक हवेची हाव पशुत्वाच्या पातळीला घेऊन गेली.
आम्ही नवनवीन तंत्रज्ञान, माहिती, शोध संशोधनाच्या बळावर कमालीचे शोध लावले. नवनवीन पिके,फळं, पालेभाज्या कोणत्याही ऋतुत कोणत्याही गोष्टी मिळू लागल्या, दिवसाला तीस-चाळीस लिटर दूध देणाºया गाई तर पाचपन्नास लिटर दूध देणाºया म्हशी उपलब्ध होऊ लागल्या. जमिनीतल्या पाण्याचा बेसुमार वापर औद्योगिकीकरण शेती,कारखानदारी व बेजबाबदारपणे केला जाऊ लागला. तरीही हायब्रिडीकरण वाण व संशोधनामुळे एकंदरीत उत्पादन वाढत गेलं. दुसरीकडे मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारल्याने आयात धोरण स्वीकारावे लागते. पर्यायाने आमच्याकडे उपलब्ध सारं असताना मुबलक उत्पादनामुळे किमान हमीभाव धोरण राबवण्यात अडचणी सांगण्यात येतात. तर दुसरीकडे बी-बियाणे,खते,औषधे,मशागतीचे मळणी मशिनीपासून मजुरापर्यंत सारे वाढते दर भारतीय शेतीचा गळा घोटत आहेत. त्याच्या वाढीबाबत कुणी बोलायला तयार नाही. त्याच्यावर नियंत्रण आणण्याचा विचारही कुणी करत नाही. कधीतरी कांद्याला दोन पैसे मिळाले की सामान्य ग्राहकांच्या डोळ्याला पाणी येते. जनता आंदोलनही करते. मग तीच जनता आज शेतकºयांचा सर्व माल दोन-पाच रुपयांनी नव्हे तर पैशांनी विकला जातो तेव्हा शेतकºयांचे दु:ख पाहून गप्प राहणे. मतासाठी आश्वासनांची खैरात मागताना गळा फाटेपर्यंत केलेली भाषणे कशी विसरतात ?
शेतकºयांचे नेते कैवारी खुर्चीच्या उबेने सुस्त होताना का दिसतात. आज शेतकºयांना माल रस्त्यावर फेकायला लागतो, दूध ओतून द्यावं लागतं आहे. ना स्वत:च्या ना गाई-म्हशींच्या त्यांच्या बाळांच्या तोंडचं दूध रस्त्यावर ओततानाच्या, घरातील आजारी पोराबाळाचा वा स्वत:च्या जिवाची कसलीही काळजी न करता रात्रंदिवस तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेलं पीक जेव्हा मातीमोलानं विकलं गेल्यानंतर त्यांच्या काळजाला होणाºया यातनाचा अभ्यास करण्यासाठी तरी एखादी समिती नेमता येईल का ? याचा विचार करावा. हमीभाव देऊ शकत नाही, नका देऊ पण चाळीस पैसे, एक, दोन रुपये किलोचा भाव कोणत्या निकषांवर काढता ते गणित तरी समजावून सांगाल की नाही.
निसर्गाच्या दुष्टकालचक्र कायम आमच्या पाचवीला पूजलेला. हजार विघ्नं, अडचणी, समस्यांशी कडवी झुंज देतानाही न डगमगणारा शेतकरी त्यांच्या कष्टाचं होत असलेलं अवमूल्यन पाहून मात्रं त्याचा होणारा चेहरा व आत्म्याची तळतळाट टिपताना का सारे शांत राहतात. सामान्य शेतकरी कुटुंबातून गेलेली व या व्यवस्थेशी संबंधित अधिकारी, पदाधिकारी व तमाम व्यवस्था हताश होऊन सारं पाहतो. तेव्हा अंतर्मनात एकच प्रश्न उठतो की खरंच आम्ही शेती केली हा गुन्हाच केला का? हा मूक आक्रोश का कुठल्या कान वा हृदयाच्या पर्यंत पोहोचत नाही? सगळे जाणते राजे अजाण का होतात?
शेतकºयांना दिलेला आश्वासनांचा गृहपाठ कोण कधी पूर्ण करणारच नाही का? नका देऊ काही. होय आम्ही गुन्हाच केला आहे, करत आहोत, करत राहू कारण आम्ही जगाचे पोशिंदे आहोत,अन्नदाते आहोत काळ्या आईचे पुत्र आहोत. तिच्याशी इमान राखण्याचा गुन्हा करत राहू पण साºया व्यवस्थेला एक नम्र विनंती करतो की किमान, शेतीला जोडव्यवसाय करा, शेतीमालाला प्रक्रिया करण्याचा उद्योग करा, पिकांचं नियोजन करा, सामूहिक शेती करा... वगैरे वगैरे सल्ले देऊन आमच्या दु:खावर डागण्या देऊन आणखी त्रास देऊ नका. दारात मढं घेऊन बोंब मारणाराला नवी लेकरं जन्माला घाला सांगण्याचा उन्माद तरी करु नका. समाजातील नोकरवर्गांना वर्षात दोनवेळची महागाई एक वेतनवाढ बिनबोभाट तर इकडे कायम संघर्षच ज्यांच्या नशीबात आहे असा शेतकरी सर्वांनाच प्रश्न विचारतोय. शेती करतो आम्ही गुन्हा करतो का..?- रवींद्र देशमुख(लेखक हे उपक्रमशील शिक्षक अन् साहित्यिक आहेत.)