सोलापूर : जागतिक एड्सदिनानिमित्त शहर व जिल्ह्यामध्ये जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले. महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटीअंतर्गत जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण केंद्र, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थाअंतर्गत विविध ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आले.
मार्केट यार्ड येथे तपासणी कार्यक्रम, पोस्टर प्रदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. जिल्हा सहनियंत्रण दिनेश राठोेड यांनी उपस्थितांचे स्वागत केले. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन शेगार यांनी कार्यक्रमाची माहिती दिली. यंदाच्या वर्षाची कल्पना ही जागतिक एकता आणि सामाईक जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून एचआयव्ही, एड्ससंबंधित देण्यात येणाऱ्या सुविधांबद्दल माहिती दिली. माथाडी कामगार, हमाल, वाहनचालक यांनी प्रदर्शन पाहिले. आयसीटीसी मोबाइल व्हॅनमधून समुपदेशन करून १४९ जणांची एचआयव्ही तपासणी करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात रक्तदान शिबिर घेण्यात आले. निरायम आरोग्य धाम, क्रांती महिला संघ, परमप्रसाद चॅरिटेबल ट्रस्ट, विहान प्रकल्प, सोलापूर जिल्हा सामाजिक कार्य समिती, सेवाधाम संस्थामधील पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृष्णा सकट, दिनेश राठोड, विक्रांत सुरवसे, संतोष बिराजदार, गेनराज दरेकर यांनी प्रयत्न केले. अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, कार्यक्रम अधिकारी भगवान भुसारी यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्यक्रम घेण्यात आले.
----------