सोलापूर : एचआयव्ही/एड्स या जीवघेण्या आजाराने संक्रमित होण्याचे प्रमाण घटत आहे. जिल्ह्यामध्ये मागील पाच वर्षांत एचआयव्ही बाधितांची संख्या निम्म्याने कमी झाली आहे. दरवर्षी या आजाराने संक्रमित होण्याचे प्रमाण कमी होत आहे.
शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व जनजागृतीमुळे बाधितांची संख्या आटोक्यात येत असल्याचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी भगवान भुसारी यांनी सांगितले. याशिवाय विविध सामाजिक संस्थांचेही यामध्ये योगदान आहे. २०१२-१३ मध्ये जिल्ह्यात २ हजार २१९ संसर्गित होते. २०१९-२० मध्ये १ लाख ४० हजार ६६० जणांच्या एचआयव्हीची चाचणी करण्यात आली. यात १ हजार ११६ जण बाधित असल्याचे स्पष्ट झाले, तर २०२०-२१ या वर्षात चाचणी घेणे सुरू असून आतापर्यंत घेतलेल्या १ लाख ३३ हजार चाचण्यांमधून १ हजार ३३ जण बाधित आहेत. मागील काही वर्षांमध्ये बाधित होण्याच्या प्रमाणात कमी आली आहे.
१५ बाळांना एचआयव्हीपासून वाचविण्यात यश
एचआयव्ही बाधित असलेल्या गर्भवती आईकडून बाळाला आजार होण्याचा धोका असतो. वैद्यकीय उपचार, औषधोपचार आणि विशेष काळजी घेतल्याने बाळाला बाधित होण्यापासून वाचविता येते. सोलापुरातील एआरटी सेंटरमध्ये १७ बाधित माता आल्या होत्या. या मातांच्या १५ बालकांना एचआयव्हीपासून वाचविण्यात यश आले.
एआरटी प्लस सेंटरमुळे मुंबईला जाण्याची गरज नाही
सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एआरटी प्लस सेंटर सुरू झाले आहे. त्यामुळे अत्याधुनिक उपचार व अद्ययावत औषधे रुग्णांना देण्यात येतात. या सेंटरमुळे बाधित असलेल्यांना आता पुणे-मुंबई येथे जाण्याची गरज असणार नाही. अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली एसएसीईपी (स्टेट एड्स क्लिनिकल एक्सपर्ट पॅनेल) समिती स्थापन करण्यात आली. यात मेडिसीन विभागाचे डॉ. विठ्ठल धडके, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. विद्या तिरणकर, त्वचारोग तज्ज्ञ डॉ. गड्डम, बालरोग तज्ज्ञ डॉ. शाकिरा सावस्कर यांचा समावेश असल्याचे एआरटी प्लस सेंटरच्या वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. अग्रजा चिटणीस यांनी सांगितले.