सोलापूर : शेतीच्या अरिष्टाला सरकारची नवउदारवादी धोरणे कारणीभूत आहेत. बहुराष्टÑीय कंपन्यांच्या फायद्यासाठी सरकारने अनेक क्षेत्रात परदेशी गुंतवणूक स्वीकारली आहे. त्यामुळेच आज शेतकरी मोठ्या संकटात आलेला आहे, असे मत प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ प्रा.अजित अभ्यंकर यांनी व्यक्त केले. स्टुडंट फेडरेशन आॅफ इंडिया (एसएफआय) च्या राज्यस्तरीय अभ्यास शिबिरातील दुसºया दिवशीच्या दुसºया सत्रात ते बोलत होते.
‘नवउदारवादी धोरणे आणि शेतीवरील अरिष्ट’ या विषयावर पुढे बोलताना प्रा.अभ्यंकर म्हणाले, भारतात १९९० नंतर सर्वच क्षेत्रात सरकारने उदारीकरण राबविण्याचे ठरविले. बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या फायद्यासाठी सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील अनेक बाबतीत गुंतवणूक स्वीकारून शेती क्षेत्राला अधिक संकटात टाकले आहे.
स्वातंत्र्य मिळाले तेव्हा भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नात शेतीचा वाटा मोठ्या प्रमाणात होता. आज तेच प्रमाण खूप कमी झाले आहे. त्याची सर्व कारणे सध्या सरकार राबवत असलेल्या नवउदारवादी धोरणांमध्ये सापडतात. आज शेतीमालाला योग्य हमीभाव मिळत नाही. योग्य हमीभाव नसल्याने शेतकरी अडचणीत आहे. सरकार मात्र आपल्या शेतकºयांना योग्य भाव देण्याऐवजी तेच धान्य आयात करत आहे. ही परिस्थिती सरकारच्या धोरणांमुळे निर्माण झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शेती क्षेत्राचा अभ्यास केला पाहिजे, असेही प्रा.अभ्यंकर म्हणाले.
या सत्राच्या अध्यक्षस्थानी ‘एसएफआय’ राज्य कमिटी सदस्या मीना आरसे या होत्या तर सत्राचे संचालन राज्य कमिटी सदस्य विलास भुयाळ आणि सत्यजित मस्के यांनी केले.
शिबिरामध्ये एका विषयावर मांडणी झाल्यानंतर त्या विषयावर गटनिहाय चर्चा घडवून आणली जात आहे. चर्चेतून आलेल्या प्रश्नांवर वक्ते उत्तरे देत आहेत. त्याचबरोबर संध्याकाळी क्रांतिकारी गीतांसह सांस्कृतिक कार्यक्रमही या शिबिरात होत आहे. ५ जूनपर्यंत हे शिबीर चालणार आहे.