शहराध्यक्षपदासाठी अजितदादांचे तीन पर्याय इच्छुकांना मान्य; सोलापुरातील तिढा साेडविणार
By राकेश कदम | Published: August 17, 2023 10:54 AM2023-08-17T10:54:13+5:302023-08-17T10:54:56+5:30
शहराच्या राजकारणात ग्रामीण नेत्यांच्या शब्दाला महत्त्व
साेलापूर : राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या साेलापूर शहराध्यक्षपदाचा तिढा साेडविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इच्छुकांना तीन पर्याय सुचविले. हे पर्याय मान्य असून अजित पवार जाे निर्णय घेतील त्यानुसार काम करू, असे मत संताेष पवार, किसन जाधव आण जुबेर बागवान गुरुवारी 'लाेकमत'कडे व्यक्त केले. साेलापूर शहराच्या या निवडीत माढ्याचे आमदार बबनराव शिंदे, करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे, माेहाेळचे आमदार यशवंत माने आणि माजी आमदार राजन पाटील यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे.
साेलापूर शहराध्यक्ष निवडीसाठी अजित पवारांनी बुधवारी मुंबईत बैठक घेतली हाेती. शहराध्यक्षपदासाठी संताेष पवार, किसन जाधव, जुबेर बागवान इच्छुक आहेत. तिघेही अजित पवारांचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. किसन जाधव हे तीन टर्म नगरसेवक हाेते. महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने किसन जाधव यांनाच शहराध्यक्ष करावे अशी मागणी माेहाेळचे आमदार यशवंत माने यांनी अजित पवार यांच्याकडे केली हाेती. संताेष पवार, जुबेर बागवान यांनाही संघटनात्मक कामांचा अनुभव आहे.
त्यामुळे पवार आणि बागवान यांच्याकडे संघटनात्मक कामांचा जबाबदारी साेपवून जाधव यांच्याकडे राष्ट्रवादीने महापालिकेची जबाबदारी द्यावी असे मत पक्षातील काही नेत्यांनी अजित पवार यांच्याकडे व्यक्त केले. मुंबईतील बैठकीला तिघेही हजर हाेते.. तुम्ही एकमत करा. इथेच निर्णय घेऊ, असे तटकरे म्हणाले हाेते. त्यावर सर्वजण गप्प बसले. तिघांपैकी एकाला शहराध्यक्ष, एकाला कार्याध्यक्ष, तर एकावर महापालिका निवडणुकीची जबाबदारी दिली तर कसे राहील?, असे अजितदादांनी विचारले हाेते. मुंबईतील बैठकीनंतर तिघेही गुरुवारी साेलापुरात पाेहाेचले. अजित पवार जाे निर्णय घेतील ताे आम्हाला मान्य आहे. आम्ही त्यांच्यासाेबत राहणार आहाेत. आजवर त्यांनी जे जे सांगितले त्यानुसार राजकारण केले असेही तिघांनी पत्रकारांना सांगितले.त्यामुळे दादा गटाचा अध्यक्ष काेण हाेणार याकडे लक्ष लागले आहे.