सोलापूर - भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी सोलापुरात येऊन अल्पसंख्यांक बांधवांच्या विरोधात वक्तव्य केली. या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेस धिक्कार करत आहे. नितेश राणे यांनी सोलापूर शहराचे वातावरण बिघडू नये अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.
उमेश पाटील म्हणाले, हिंदू धर्मातील व्यक्तींनाही सलोखा हवा आहे. सोलापूर शहरात उद्योग विकसित होत आहेत. जिथे शांतता असते तिथेच उद्योग विकसित होत असतात. भाजपा आमदार नितेश राणे यांनी नुकतेच सोलापुरात येऊन अल्पसंख्यांक समाजाच्या भावना भडकवणारी वक्तव्य केली. या वक्तव्यांचा आम्ही धिक्कार करीत आहोत. शहराची शांतता बिघडवण्याचा अधिकार कोणालाही नाही, असेही उमेश पाटील यांनी सांगितले.
जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली होती. यावर उमेश पाटील म्हणाले, जितेंद्र आव्हाड हे शरद पवार यांच्या प्रकृतीची चिंता न करता केवळ त्यांना उन्हातानात कसे फिरवता येईल. त्यांचा वापर करून निवडून कसे येता येईल हे बघत आहेत. अजितदादा पवार यांनी कधीही शरद पवार यांचा अवमान होईल असे वक्तव्य केले नाही. अजितदादांना शरद पवार यांच्या प्रकृतीची चिंता आहे असे पाटील म्हणाले.