अजित पवार म्हणाले, मनपा आयुक्तांविरोधात अविश्वास ठराव आणा, आम्ही तो मंजूर करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 01:04 PM2021-05-12T13:04:30+5:302021-05-12T13:04:36+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकींग
सोलापूर -सोलापूर महापालिकेचे आयुक्त पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेत नाहीत. त्यांना किंमत देत नाहीत, अशी तक्रार महापौर श्रीकांचना यन्नम यांनी केली. तुमचे ऐकत नसतील तर काय उपयोग? ऐकत नसतील तर सभागृहात अविश्वास ठराव आणा. आम्ही तो मंजूर करून आयुक्तांना परत बोलावू, असा शब्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूरच्या महापौर श्रीकांचना यन्नम यांना दिला.
उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनीच्या प्रलंबित कामांवर चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री पवार यांनी मंगळवारी मुंबईतून व्हीसीद्वारे बैठक घेतली. जलसंपदामंत्री जयंत पाटील, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, नगरविकास खात्याचे प्रधान सचिव महेश पाठक, आमदार प्रणिती शिंदे, महापौर श्रीकांचना यन्नम, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मनपा आयुक्त पी. शिवशंकर, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, स्मार्ट सिटीचे कार्यकारी संचालक त्रिंबक ढेंगळे-पाटील, उपमहापौर राजेश काळे, सभागृह नेते श्रीनिवास करली, नगरसेवक महेश कोठे, चेतन नरोटे, आनंद चंदनशिवे, रियाज खरादी, किसन जाधव आदींनी या बैठकीत सहभाग नोंदविला.
बैठकीच्या सुरुवातीला अजित पवारांनी लोकप्रतिनिधी आणि नगरसेवकांचे म्हणणे ऐकून घेतले. सोलापुरात आठ दिवसाआड पाणी येते. पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी समांतर जलवाहिनीचे काम करणे आवश्यक आहे. भूसंपादनाचे पैसे देण्याची पालिकेची क्षमता नाही. शासनाने पैसे द्यावेत, अशी मागणी आनंद चंदनशिवे यांच्यासह इतर लोकप्रतिनिधींनी केली. महापौर यन्नम यांनीही निधीसाठी आग्रह धरला. भूसंपादनाची नुकसानभरपाई ५५ कोटींवरून १३० कोटींवर गेलीच कशी, याची चौकशी करा. मुख्य सचिव, जिल्हाधिकारी, आयुक्त, महापौर यांची एक समिती करून अहवाल पाठवा. आम्ही निधी उपलब्ध करून देऊ, असे त्यांनी सांगितले.