सोलापूर: काँग्रेस पक्षाचे आणि त्यातल्यात्यात मागासवर्गीय मंत्री असल्यामुळेच वीज बिलाच्या प्रस्तावाला अर्थमंत्र्याकडून जाणीवपूर्वक अडचण निर्माण केली जात आहे. नाहीतर थकीत वीजबिलाचा प्रश्न कधीच मार्गी लागला असता, असे मत व्यक्त करीत वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी थेट बारामतीकरांवर टिका केली.
वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर हे शनिवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते. तेव्हा आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत एका प्रश्नाला उत्तर देताना ॲड. प्रकाश आंबेडकर हे बोलत होते.
लाॅकडाऊन काळातील थकीत वीज बिल शासनाने माफ करावे अशी मागणी राज्यभरातून होत आहे, याची दखल घेऊन राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी थकीत बिल माफ करण्याच्या अनुषंगाने तसा प्रस्ताव मंत्रीमंडळात सादर केला होता. मात्र राष्ट्रवादीचे नेते राज्याचे अर्थमंत्री अजित पवार हे जाणीवपूर्वक ऊर्जामंत्र्यांच्या प्रस्तावाला अडचण निर्माण करत आहेत. राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत हे केवळ मागासवर्गीय मंत्री असल्यामुळेच बारामतीकर हे थकीत वीज बिलाच्या प्रस्तावाला विरोध करत आहेत, असे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली.
लाॅकडाऊन काळात वाढीव वीज युनिटच्या वाढीव दरा बाबत ट्राय कोर्टाकडून सुनावणी होणे अपेक्षित आहे तसा कायदा असता देखील ठाकरे सरकारने वीज बिलाच्या युनिट दरात दुप्पटीने वाढ केली आहे , वीज युनिटचा दरात केलेली वाढ अगोदर सरकारने रद्द करावी अशी मागणीही यावेळी ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली. यावेळी वंचित बहूजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते आनंद चंदनशिवे, बबन शिंदे, प्रा.अंजना गायकवाड, विनोद इंगळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (पी.जी.) चे प्रदेश अध्यक्ष प्रमोद गायकवाड आदी उपस्थित होते.