रोजच वाढत चाललेल्या रुग्ण संख्येमुळे प्रशासनाने नवीन इमारत ताब्यात घेण्याची हालचाल सुरू केली आहे. सध्या म्हाडा कॉलनी जवळील समाजकल्याण विभागाच्या इमारतीत कोविड सेंटर सुरू आहे. त्याची क्षमता २०० ची असताना सध्या २५२ रुग्ण उपचार घेत आहेत. रोजच बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे जागेची अडचण भासू लागल्याने नव्याने काही धर्मादाय संस्थेची जागा ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. ज्या गतीने रुग्णसंख्या वाढत आहे. त्याच गतीने रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही आहे. आतापर्यंत ८६ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी काही जेष्ठ नागरिक व विविध आजाराच्या रुग्णांचा समावेश आहे.
यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन मारकड, डॉ. शिवलीला माळी, आरोग्य सेवक आय. एम. काझी, आरोग्य सेविका एस.एल. राठोड, टी. एन. बंडगर, कक्ष सेवक नीलेश जाधव, अमोगसिद्ध वंजारी, परमेश्वर काळे हे परिश्रम घेत आहेत.
सोलापूरला जाण्याऱ्या रुग्णसंख्येतही घट
बाधित रुग्ण कोविड सेंटरमध्ये १० दिवस क्वारंटाईन करून उर्वरित पाच दिवस गृहविलगीकरण करण्यात येत आहे. या कालावधीत रुग्णांना आजार कमी जास्त झाले की येथील स्वामी समर्थ डेडिकेटेड हेल्थ कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात येत आहे. याठिकाणी ऑक्सिजनसह अनेक प्रकारची सुविधा उपलब्ध आहे. परिणामी सध्या उपचारासाठी सोलापूरला जाणाऱ्या रुग्णसंख्येत घट झाली आहे. नागरिकांनी कोरोनाला हरविण्यासाठी मास्क, सॅनिटायझर, फिजिकल डिस्टन्स ठेवावे. तसेच काेरोना नियम पाळून गरजेच्या कामाशिवाय बाहेर पडणे टाळावे, असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आश्विन करजखेडे यांनी सांगितले.